कोल्हापूर भाजपमुक्तच : प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या होमपिचवरच भाजप शून्यच
विजयात शिवसेनेचा सिंहाचा वाटा
शबनम न्यूज : कोल्हापूर वृत्तसंस्था (दि.१६ एप्रिल) :- गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. आज सकाळी आठ वाजल्यापासून याठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली. कोल्हापूर उत्तर मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी १८,९०१ मतांनी विजय मिळवला आहे. या पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांना एकूण ९६ हजार २२६ मत मिळाली तर भाजपचे पराभूत उमेदवार सत्यजित कदम यांना ७७ हजार ४२६ मत मिळाली. भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम पराभूत झाले आहेत. या विजयामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदाराचा मान जयश्री जाधव यांना मिळाला आहे.
जयश्री जाधव यांनी या विजयाचे संपूर्ण श्रेय सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि कोल्हापुरच्या सर्व जनतेला दिले आहे. त्या या विजयाबद्दल बोलताना म्हणाल्या, गट-तट बाजूला ठेवून महाविकास आघाडी एकत्र आल्याचा मला जास्त आनंद आहे. माझ्या या विजयाचं संपूर्ण श्रेय महाविकास आघाडीसोबतच सतेज पाटील, हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर आणि कोल्हापूरच्या जनतेला आहे. निवडणुकीत भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी मोठं मनदाखवायला हवं होतं, पण त्यांनी दाखवलं नाही. कोल्हापूरची जनता स्वाभिमानी असून, आण्णांच्या माघारी त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं. त्यामुळं आण्णांनी जे पेरलं, ते खरंच चांगलं उगवलंय.