२३ ते २९ एप्रिल दरम्यान आठवडाभर महोत्सवाचे कार्यक्रम
शबनम न्यूज : पुणे (दि.२० एप्रिल) :- कोरोना साथीच्या दोन वर्षांच्या खंडानंतर शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या वतीने ‘ पुणे डान्स सीझन -२o२२ ‘ या नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या वतीने रसिका गुमास्ते,अरूंधती पटवर्धन यांनी ही माहिती दिली.२३ एप्रिल ते २९ एप्रिल दरम्यान आठवडाभर या नृत्य महोत्सवाचे कार्यक्रम होणार आहेत.
जागतिक नृत्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या महोत्सवात पुण्यात विविध ठिकाणी नृत्य सादरीकरणे, फिल्म फेस्टीव्हल, ट्रेक आणि डान्स, ‘जती ‘ चॅलेंज काँपिटिशन(‘जती ‘ म्हणजे मृदूंगाचे विविध बोल एकत्र करून केलेली नृत्याधारित रचना ), वक्तृत्व स्पर्धा, ‘कवित्त ‘लेखन स्पर्धा(कवित्त म्हणजे विशिष्ट लयीत म्हटली जाणारी नृत्याधारित रचना ) अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे.
दिनांक २३, २४ एप्रिल रोजी ‘संचारी ‘ हा नृत्यावर आधारित चित्रपटांचा महोत्सव राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, प्रभात रस्ता येथे होणार आहे. २४ एप्रिल रोजी ‘जती ‘चॅलेंज काँपिटिशन होणार आहे. तसेच सिंहगड किल्ल्यावर ट्रेक -डान्स उपक्रमाअंतर्गत ट्रेक दरम्यान फ्लॅश मॉब सादरीकरण होणार आहे. २५ एप्रिल रोजी ‘त्रि-तत्वम्’ हा नृत्य कार्यक्रम ओमकारेश्वर मंदिर प्रांगणात होईल. २६ एप्रिल रोजी चिंचवड तर २७ एप्रिल रोजी चंद्रमौळेश्वर ( हडपसर ) येथे नृत्य कार्यक्रम होतील. २६ एप्रिल रोजी ‘ बोलू काही ‘ ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली असून ‘ कवित्त ‘ ही लेखन स्पर्धाही ऑनलाईन प्रणालीद्वारे होणार आहे.२८ एप्रिल रोजी भारतीय विद्या भवन येथे कार्यक्रम होईल. डान्स सीझन २०२२ची सांगता येथे होईल.या कार्यक्रमात पुण्यातील २७ शास्त्रीय नृत्यसंस्थांचा सहभाग असेल, असे संयोजकांनी सांगीतले. २९ एप्रिल रोजी ‘अभिरुची ‘ कार्यक्रमा अंतर्गत एकल शास्त्रीय नृत्य सादरीकरणे होतील.
नृत्य दिनाचे औचित्य साधून संपूर्ण शहरात वैविध्यपूर्ण असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याला विद्यार्थी आणि रसिक प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद द्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले.
शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेविषयी – २०१८ साली पुण्यातील आदरणीय नृत्य गुरु शमा भाटे, गुरू सुचेता चापेकर आणि गुरू मनीषा साठे यांच्या विचारातून शास्त्रीय नृत्य व त्याची साधना करणारे कलाकार यांच्यासाठी, शास्त्रीय नृत्य कलाकारांनी चालवलेली शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था उदयास आली. आजवरच्या संस्थेच्या कारकिर्दीत ८०० पेक्षा जास्त नृत्यकलाकार असलेला नृत्योत्सव, नृत्य दिनाचे औचित्य साधून साकारलेला डान्स सीझन च्या अंतर्गत विविध स्पर्धा, प्रदर्शने आणि सामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याकरता पुण्यातील विविध बागांमध्ये केलेले नृत्य प्रदर्शन याचा समावेश आहे. या व्यतिरीक्त ‘ लक्ष्य ‘ हा एकल सादरीकरणांचा कार्यक्रम आणि ‘नृत्यबंध ‘हा सांघिक नृत्य कलाकारांचा कार्यक्रम ॐकारेश्वर देवस्थानाच्या सहकार्याने केला जातो.
संस्थेचे उद्दिष्ट एकत्रितपणे काम करून शास्त्रीय नृत्याचे संवर्धन करणे तसेच गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि पुण्यात एक सर्व व्यवस्थासंपन्न संकुल उभारणें हे आहे.