ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे आभार
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२१ एप्रिल) :- राज्य शासनाने बैलगाडा शर्यत आयोजकांवरील विविध पोलीस ठाण्यात दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेतले आहेत. त्याबाबतचा जीआर जारी करत बैलगाडा शर्यत मालकांना मोठा दिलासा दिला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. गुन्हे मागे घेतल्याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि बैलगाडा शर्यतासाठी सातत्याने प्रयत्न करणारे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचेही गव्हाणे यांनी आभार मानले.
प्रसिद्धी पत्रकात गव्हाणे म्हणतात, सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली होती. बंदी असताना अनेक बैलगाडा प्रेमींकडून देवी-देवतांच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय शर्यतीवरील बंदी उठवावी या मागणीसाठी आंदोलने झाली होती. आंदोलन केल्यामुळे अनेक बैलगाडा मालक व शर्यत आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच शिरुरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी सरकारकडे जोरदार पाठपुरावा सुरु केला. त्यांना ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी मोठी साथ दिली. राज्य शासनाच्या माध्यमातून वकिलांची तगडी फौज सर्वोच्च न्यायालयात उभी केली.
अखेर राज्य सरकारच्या वकिलांचा युक्तीवाद मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली. अटी शर्तींवर बैलगाडा शर्यती सुरु करण्याचे निर्देश दिले. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राज्य शासनाकडे केलेल्या प्रयत्नांना यश आले. बैलगाडा शर्यतीवरील बंदीच्या काळात बंदी उठावावी यासाठी अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आली होती. अनेकांनी शर्यतींचे आयोजन देखील केले होते. यादरम्यान अनेक लोकांवर गुन्हे नोंदवण्यात आले होते. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर बैलगाडा शर्यतीसंबंधी विविध गुन्हे मागे घ्यावे ही मागणी अनेक दिवसांपासून होत होती.
बैलगाडा मालकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने बैलगाडा शर्यतीअंतर्गत दाखल सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. गुन्हे मागे घेण्याबाबतचा शासनाकडून जीआर जाहीर करण्यात आला आहे. यामुळे गुन्हा दाखल झालेल्या बैलगाडा शर्यत आयोजकांना मोठा दिलासा मिळाला आहे. बैलगाडा मालक, आयोजकांवरील गुन्हे मागे घेतल्याने गव्हाणे यांनी महाविकास आघाडीचे, नेत्यांचे जाहीर आभार मानले.