शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
केंद्र सरकारने कोळसा वाहतूक करण्यासाठी रेल्वेच्या रेकची आवश्यकता असताना जाणिवपूर्वक त्यामध्ये कपात केल्यामुळे महाराष्ट्रामध्ये कोळशाची टंचाई निर्माण झाली आहे. केवळ महाराष्ट्रातच वीजटंचाईची समस्या नसून काश्मिरपासून आंध्र प्रदेशपर्यंत निम्मा देश अंधाराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. केंद्राचे चुकीचे धोरण आणि बिगर भाजप शासित राज्यात त्रास देण्याच्या हेतूने हा सर्व काही प्रकार सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर तथा मुख्य प्रवक्ते योगेश बहल यांनी केला आहे.
सध्या सुरू असलेल्या वीजटंचाईवरून भाजपकडून कंदील मोर्चा काढला जात आहे. त्याला बहल यांनी प्रत्युत्तर दिले आहे. याबाबत बहल यांनी एक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात म्हटले आहे की, यावर्षी प्रचंड उष्णता असल्यामुळे वीजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. देशात कोळशाचे योग्य उत्पादन होत असतानाही केंद्राने कोळसा पुरविण्याऐवजी हात झटकले आहेत. तसेच कोळशाची आयात करावी असे सांगून जबाबदारीपासून पळ काढला आहे. कोळशाच्या वाहतुकीसाठी रेल्वेच्या रॅकची गरज असते त्या रेल्वे रॅकचीही अचानक कपात केल्यामुळे कोळशाची वाहतूक मंदावल्याने देशातील बहुतांश राज्यात कोळशाची टंचाई निर्माण झाली असून गेल्या 9 वर्षांतील कोळसासाठा हा निच्चांकी पातळीवर पोहोचला आहे.
एका बाजूला वाढती मागणी आणि केंद्र शासनाचे चुकीचे धोरण याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असताना राज्यातील भाजपाच्या नेत्यांना कंदीला मोर्चा काढण्यात अधिक रस आहे. केंद्रातील त्यांच्या सरकारने कोळशाचा पुरवठा केल्यास राज्यातील वीजटंचाई दूर होऊ शकते मात्र प्रश्न सोडविण्याऐवजी त्याचे राजकारण करण्यात अधिक रस असलेल्या भाजपाकडून केले जाणारे राजकारण हे अत्यंत दुर्देवी आहे.
देशामध्ये वीज तुटवडा 623 दशलक्ष युनिटपर्यंत पोहोचला असताना केंद्राला आणि भाजप नेत्यांना त्याचे काही सोयरसुतक नाही. केवळ नौटंकी करण्यात आणि सत्तेसाठी जनतेला वेठीस धरणाऱ्या भाजपच्या धोरणांना जनताही आता कंटाळली आहे. भाजप नेत्यांची नौटंकी सर्वसामान्य जनतेच्याही लक्षात आल्यामुळे राज्यासह पिंपरी-चिंचवडमधील जनता भाजपला येत्या निवडणुकांमध्ये धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा विश्वासही बहल यांनी व्यक्त केला आहे.