शबनम न्युज | मुंबई
ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन झालं. आपल्या गिरगाव येथील निवासस्थानी त्यांनी अखेरच्या श्वास घेतला. प्रदीप पटवर्धन यांची मोरूची मावशी या नाटकातील भूमिका अतिशय गाजली होती. त्यांनी अनेक नाटकं आणि चित्रपटांमध्ये भूमिका साकारत आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं होतं.
प्रदीप पटवर्धन हे मुंबईतील गिरगाव परिसरात स्थायिक होते. महाविद्यालयापासूनच त्यांनी एकांकिकांमध्ये अभिनय साकारण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा व्यावसायिक रंगभूमीकडे वळवला. मोरूची मावशी या नाटकातील त्यांची भूमिका फार गाजली. मराठी रंगभूमीवर अनेक दशके हाऊसफुल्लचा बोर्ड मिरवणाऱ्या ‘मोरुची मावशी’ या नाटकातील प्रदीप पटवर्धन यांची भूमिकाही खूप गाजली होती. याशिवाय त्यांनी ‘नवरा माझा नवसाचा’, ‘चश्मे बहाद्दर’, ‘1234’, ‘लावू का लाथ’, ‘भुताळलेला’, ‘नवरा माझा भवरा’, ‘डोम’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘जमलं हो जमलं’, ‘एक शोध’ अशा अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला.