शबनम न्युज | पुणे
गणेश उत्सवानिमित्त शहरात अनेक ठिकाणी भाविकांची गर्दी होताना दिसते. याच गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरी होण्याच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. असाच एका प्रकारातील चोरट्यांच्या टोळीला सिंहगड पोलिसांनी अटक केली.
गणेशोत्सवातील गर्दीत मोबाईल चोरी करण्यासाठी आलेल्या कर्नाटकातील चोरट्यांच्या टोळीला सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १५ लाख २५ हजार रुपयांचे ८४ मोबाईल संच जप्त करण्यात आले.
शरथ मंजुनाथ, केशवा लिंगराजू, नवीन हनुमानथाप्पा अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. उत्सवाच्या कालावधीत मोबाईल चोरी करण्यासाठी हे सर्व शहरात आले होते. गेल्या दहा दिवसांपासून त्यांनी मार्केट यार्ड, बालाजी नगर, स्वारगेट, पीएमपी स्थानक, सिंहगड रस्त्यावरील अभिरुची परिसर, वडगाव भाजी मंडई परिसरासह गर्दीच्या ठिकाणाहून नागरिकांकडील मोबाईल संच लांबविले होते. तसेच सिंहगड रस्त्यावरील फन टाईम चित्रपटगृहाजवळ मोबाईल चोरट्यांची टोळी थांबल्याची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने सापळा लावून तिघांना ताब्यात घेतले.