शबनम न्युज | पुणे
‘ मानवी बांधकामांच्या वाढीला मर्यादा असल्याने पर्यावरणपूरक विकासविषयक मुद्दयांवर काळजी घ्यावी,आर्किटेक्ट आरेखनाच्या केंद्र स्थानी पर्यावरण हा घटक आणावा ‘, असा सूर आर्किटेक्चरविषयक मार्गदर्शन सत्रात शुक्रवारी सायंकाळी उमटला.
आर्किटेक्चर क्षेत्रातील करियरशी निगडित मुद्द्यांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी,चर्चा करण्यासाठी ‘गोल्डन जंप स्टार्ट ‘ या उपक्रमात दि.१५ डिसेंबर रोजी सायंकाळी ”रेग्युलेटरी मेकॅनिझम्स रिलेटेड टू एन्व्हायर्नमेंटल क्लिअरन्स अँड ग्रीन बिल्डींग सर्टीफिकेशन ‘, पर्यावरणविषयक मुद्यांवर व्ही.के.एन्हॉयर्नमेंटल च्या संस्थापक -पार्टनर अनघा परांजपे -पुरोहित, व्ही.के.एन्हॉयर्नमेंटल च्या संस्थापक -पार्टनर डॉ.पूर्वा केसकर यांनी मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम व्ही.के. ग्रुपच्या सेनापती बापट रस्त्यावरील मुख्यालयात झाला.या मेंटरशिप प्रोग्रामसाठी ३० विद्यार्थी निवडण्यात आले आहेत. ह्रषीकेश कुलकर्णी यांनीयांनी प्रास्ताविक केले.शिवाली वायचळ, अमोल उंबरजे यांनी संयोजन केले.
डॉ.पूर्वा केसकर म्हणाल्या, ‘ पर्यावरण धोक्यात आले तर विकास धोक्यात येईल. म्हणून शाश्वत विकासावर भर दिला पाहिजे.पर्यावरणाच्या स्वरूपानुसार जीवनशैली आणि संस्कृती उगम पावते.ती विकासाच्या वेगात धोक्यात आणू नये. तंत्रज्ञान, औद्योगिकीकरणामुळे पर्यावरणावर दुष्परिणाम होऊ लागला आहे, पर्यावरणाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू नये, कोणत्याही बांधकामाच्या आरेखनाच्या केंद्रस्थानी पर्यावरण आणले पाहिजे, कालानुरूप( कंटेपररी) आर्किटेक्चर चा विचार केला पाहिजे.असेही डॉ.केसकर यांनी सांगीतले.
जगभर ‘ ग्रीन बिल्डींग ‘ संकल्पनेचा पाठपुरावा केला जात आहे.तंत्रज्ञानाचाच वापर करून इमारतींमध्ये उर्जा आणि पाण्याचा वापर कमी करा, बांधकाम साहित्य पर्यावरणस्नेही निवडले पाहिजे, देशी वृक्ष, वनस्पती लावल्या पाहिजे, पाण्याच्या पुनर्वापराची व्यवस्था करावी, हमारतीचे रेटींग, सर्टिफिकेशन करण्याचा आग्रह धरावा असे उपाय त्यांनी सुचवले.
अनघा पुरोहित यांनी एन्व्हॉयर्नमेंट इंपॅक्ट असेसमेंट(ई.आय.ए.) नोटीफिकेशन २००६, एन्व्हॉयर्नमेंट प्रोटेक्शन अॅक्ट २००६ ची माहिती दिली. त्या म्हणाल्या,’ २० हजार चौरस मीटर पेक्षा अधिक मोठी इमारत बांधायची असेल तर एन्व्हॉयर्नमेंट इंपॅक्ट असेसमेंट(ई.आय.ए.)च्या परीघात येते. ही प्रक्रिया समजावून घेतली पाहिजे.
पर्यावरणविषयक कायद्यांची भीती बाळगू नये, ते समजावून घ्यावेत. या कायद्यांनुसार आरेखन ( प्लॅन )मंजुरीसाठी किमान ६ महिन्यांचा काळ आर्किटेक्ट मंडळींनी गृहित धरावा.या कायद्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे, ते सर्वांच्या हिताचे आहे, इमारत बांधकाम करताना कार्बन फूट प्रिंट कमी करण्याचा प्रयत्न करावा, असे अनघा पुरोहित यांनी सांगीतले.
आर्किटेक्चर विषयक मार्गदर्शन सत्रांमधून मार्गदर्शन
१२ डिसेंबर रोजी व्ही.के. ग्रुपच्या ऑपरेशन्स विभागाच्या संचालिका अपूर्वा कुलकर्णी यांनी ‘ आर्किटेक्चर क्षेत्रातील कारकिर्दीची उभारणी ‘ या विषयावर मार्गदर्शन केले. १३ डिसेंबर रोजी ह्रषीकेश कुलकर्णी यांनी प्रकल्प व्यवस्थापन विषयावर मार्गदर्शन केले.
‘ १४ डिसेंबर रोजी द्वैपायन चक्रवर्ती ‘ प्रकल्प व्यवस्थापन ‘ विषयावर मार्गदर्शन केले. ज्येष्ठ आर्किटेक्ट व्ही.के. ग्रुप चे संस्थापक विश्वास कुलकर्णी यांनी ही संवाद साधला.१५ डिसेंबर रोजी ‘ प्लॅन सँक्शनिंग ‘ विषयावर ह्रषीकेश कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. १७ डिसेंबर रोजी ज्येष्ठ आर्किटेक्ट विकास अचलकर,सीतेश आगरवाल या वरिष्ठ आर्किटेक्ट मंडळींशी संवाद साधण्याची संधी या विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
ज्येष्ठ आर्किटेक्ट विश्वास कुलकर्णी यांनी स्थापन केलेल्या व्ही. के. ग्रुप या प्रसिद्ध आर्किटेक्चर कंपनीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त हे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत .