शबनम न्युज | पुणे (वृत्तसंस्था)
नवीन वर्षाच्या पार्श्ववभूमीवर पुणे शहर पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण शाखेने फर्ग्युसन कॉलेज (FC) रोड आणि महात्मा गांधी (MG) रोडवर ‘नो व्हेईकल झोन’ घोषित केले आहेत. न्यू इयर उत्सव साजरा करण्यासाठी पुण्यात नागरिक सज्ज झाले आहे. न्यू इयर उत्सव निमित्ताने वाहनांचा प्रवाह एमजी रोडवरून पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिस उपायुक्त (वाहतूक) विजयकुमार मगर यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार एफसी रोडवर गुड लक चौक ते फर्ग्युसन कॉलेजच्या मुख्य गेटपर्यंत आणि एमजी रोडवर १५ ऑगस्ट चौक ते हॉटेल अरोरा टॉवर्सपर्यंत वाहनांना परवानगी दिली जाणार नाही. ३१ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७ ते १ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत सदर आदेश लागू राहणार आहे.
नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे आणि मद्यपान करून वाहन चालविणे टाळावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’ विरोधात मोठी मोहीम राबवली जाईल आणि दारू पिऊन वाहने चालवताना आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे निवेदनात म्हटले आहे.
तसेच, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळील वाहतूक १ जानेवारीला पहाटे ५ वाजल्यापासून बदल होणार आहे, कारण नवीन वर्षाच्या निमित्ताने अनेक लोक मंदिरात प्रार्थना करण्यासाठी येत आहेत. मंदिराजवळ गर्दी होऊ नये म्हणून शिवाजी रोड आणि बाजीराव रस्त्यावरील ठराविक ठिकाणांहून वाहने पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.