शबनम न्युज | पुणे
पुण्यात पाषाण येथे एका व्यक्तीवर कुऱ्हाडीने हातावर वार करून जखमी करण्यात आले. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये ३ आरोपी अल्पवयीन आहेत. पंकज तांबोळी (वय. २५, रा. पाषाण) असे जखमीचे नाव आहे. ही घटना ३१ डिसेंबर मध्यरात्री पाषाण येथे घडली. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गौरव मानवतकर (रा. सुतारवाडी ) व यासोबत ३ अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन वर्षाच्या उत्सवादरम्यान, तांबोळी आणि त्यांचे मित्र मध्यरात्री साई चौकात जेवायला गेले होते. तेथून परतत असताना, गौरव मानवतकर आणि त्याच्या सोबत असणाऱ्या ३ अल्पवयीन मुलांनी मोटारसायकलवरून येऊन पंकज तांबोळी आणि मयूर फुंदे यांच्याकडे १०० रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांच्यात हाणामारी झाली. या हाणामारीत आरोपींनी तांबोळी यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. यामध्ये तांबोळी यांचा मनगटापासून हात तोडण्यात आला. तांबोळीला लगेच रुग्णालयात नेण्यात आले, त्यांच्यावर ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. याबाबत अधिक तपास चतुश्रृंगी पोलीस करीत आहे.