शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीचे आमिष दाखवून पाच जणांची ५.६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. फरदीन फिरोज खान (२३, रा. रस्टन कॉलनी, चिंचवड) असे आरोपीचे नाव आहे. या संदर्भात २२ वर्षीय महिलेने रविवारी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पुण्यातील एका सॉफ्टवेअर कंपनीत संचालक असल्याचे सांगून वर्षभरापूर्वी तो फिर्यादींच्या संपर्कात आला होता. सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी देण्याचे आश्वासन देऊन त्याने फिर्यादींकडून महागडे लॅपटॉप, ब्रँडेड कंपन्यांचे मोबाईल, असे सुमारे ५.१ लाख रुपये किंमतीचे साहित्य घेतले. तसेच महिलेकडून ५५ हजार रुपये रोख घेतले. मात्र त्यानी कोणालाही कोणतीही नोकरी दिली नाही. फसवणूक झालेली लक्षात येताच फिर्यादींनी पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी आरोपीवर भादवि कलम ४२०, ४०६ अन्वये गुन्हा दाखल केला. न्यायालयाने त्याला १९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, याबाबत अधिक तपास पिंपरी चिंचवड पोलीस करीत आहेत.