शबनम न्युज | चिंचवड
चिंचवड विधानसभेचे स्व.आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर आता विधानसभेत पद रिक्त झाले आहे. आता या जागेवर पोटनिवडणूक होणार असल्याचे केंद्रीय आयोगाने घोषित केल्यांनतर इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. परंतु या जागेवर आता निवडणूक होईल कि बिनविरोध निवडणूक घेण्यात येईल, यावर प्रश्न चिन्ह असताना, भाजप सोबत इतर पक्ष निवडणूक लढविण्यास इच्छुक असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचेही नेते इच्छुक असल्याची माहिती आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भाजपची इच्छा आहे पण ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही, असे खुद्द अजित पवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे राष्टवादी काँग्रेस उमेदवार उभा करणार हे निश्चित आहे. सदर निवडणूक बिनविरोध झाली तर स्व.आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप किंवा लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना आमदारकी मिळेल. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेत्यांचीही या निवडणुकीला उभे राहण्याची तयारी आहे.तर आता या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या उमेदवाराला संधी देतील, यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या पोटनिवडणुकीला नवीन चेहऱ्याला संधी दिली तर निश्चितच अजित पवार हे त्यांचे पुत्र पार्थ पवारांना संधी देतील का? राष्ट्रवादी काँग्रेस पोटनिवडणूक बिनविरोध होऊ देणार तर नाहीच, तर अजूनही या जागेसाठी उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही, यामुळे इच्छुकांची आशा ही वाढत चालली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघ लढविण्यासाठी राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते नाना काटे, ज्येष्ठ नेते नगरसेवक भाऊसाहेब भोईर अशी अनेकांची नावे सध्या चर्चेत आहेत. परंतु अजित पवारांनी पुत्रप्रेम पुन्हा एकदा दाखविण्याचा प्रयत्न केला, तर अजित दादा नक्कीच पार्थ पवार यांना चिंचवड विधानसभा मतदारसंघ लढविण्यासाठी मैदानात उतरवतील, अशी शक्यता आहे. मागच्या वेळी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडे माजी महापौर संजोग वाघेरे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, जेष्ठ नेते नाना काटे हे प्रबळ उमेदवारीचे दावेदार असतानाही अजितदादा यांनी पार्थ पवार यांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरविले होते व मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या विरोधात पार्थ पवार यांनी लोकसभा निवडणूक लढविली व पाच लाख इतकी मते लोकसभा निवडणुकीला पार्थ पवार यांना मिळाली होती. याचा संदर्भ देऊन एखाद्या वेळेस अजित पवार हे पार्थ पवार यांना चिंचवड विधानसभा मतदारसंघ लढविण्यास तयार करतील आणि जर असे झाले तर राष्ट्रवादीला चिंचवड विधानसभा मतदार संघात यश मिळू शकते आणि जर चिंचवड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीने राखला तर आगामी महानगर पालिका ताब्यात घेण्यास राष्ट्रवादीला सोपे होणार आहे.
असा अजित पवार यांच्या दृष्टिकोनातून चिंचवड विधानसभा मतदारसंघ ताब्यात घेण्याचा संकल्प असू शकतो. परंतु राष्ट्रवादी वतीने जर नाना काटे किंवा भाऊसाहेब भोईर किंवा अन्य कोणाला उमेदवारी दिली, तर यश मिळणार नाही, असेही नाही. जेष्ठ नगरसेवक नाना काटे यांचा जनसंपर्क हा चिंचवड विधानसभा मतदारसंघात दांडगा आहे. नाना काटे यांना मानणारे मतदार मोठ्या प्रमाणात आहे. नाना काटे यांना उमेदवारी दिली, तर राष्ट्रवादीलाही यश मिळू शकते परंतु जर अजित दादांचे पुत्रप्रेम आड आले तर चिंचवड विधानसभा मतदारसंघात पार्थ पवार हे उमेदवार असू शकतात.
२०१४ च्या निवडणुकीमध्ये नाना काटे यांनी स्व. लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात चिंचवड विधानसभा मतदारसंघ लढविला होता. त्यावेळेस नाना काटे यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. हेही दुर्लक्षित करून चालणार नाही.