शबनम न्युज | चिंचवड
“अरे बापरे… ४४० व्होल्टचा करंट म्हणजे मी मरून जाणार… एवढा मोठा करंट बसल्यावर मी कसा काय जगू शकतो? आता माझ्या मतदारांना आणि कार्यकर्त्यांना सगळ्यांना आता श्रद्धांजली अर्पण करावी लागेल की काय?” अशी उपरोधिक टोलेबाजी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केली आहे.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता, “येत्या २६ तारखेला इतक्या जोरात ईव्हीएमचे बटण दाबा की ४४० व्होल्टचा करंट लागला पाहीजे. पुन्हा अजित पवारांनी चिचंवडचे नाव घेतले नाही पाहीजे, याची काळजी तुम्ही घ्या.”, असे आवाहन बावनकुळे यांनी केले. त्यांनतर त्यांच्या या आवाहनाला प्रतित्युत्तर देत अजित पवार यांनी बावनकुळेंवर टीका केली.
पवार म्हणाले, “त्या चंद्रशेखर बावनकुळेंना म्हणावं जरा बोलण्यात तारतम्य ठेवा. आपण एका सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष आहात. उगीच आपल्याला बोलण्याची संधी मिळाली म्हणून उचलली जीभ लावली टाळ्याला, असं करू नका. काहीतरी तारतम्य ठेवा. मानसिक संतुलन बिघडू देऊ नका.” अशी टीका अजित पवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केली आहे.