शबनम न्युज | चिंचवड
“मी नाना काटेंच्या पाठीशी, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा विकास कसा करायचा, ते मी नाना काटेंच्या माध्यमातून करून घेणार आहे”. विठ्ठल उर्फ नाना काटे यांना विजयी करण्याचे मतदारांना आवाहन करताना, अजित पवार यांनी वरील उद्गार काढले. पिंपरी चिंचवड शहरात चिंचवड विधानसभा मतदार संघाची निवडणूक येत्या 26 फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे. त्या निमित्ताने प्रचार सभा पिंपळे निलख येथे आयोजित करण्यात आली. या आयोजित सभेत अजित पवार बोलत होते.
महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना विजयी करण्यासाठी जोरदार प्रचार सुरू असून, प्रचंड प्रमाणात कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते मंडळी प्रचार प्रक्रियेत सहभागी झालेले आहेत. आतापर्यंत विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, स्वतः अजित पवार, शिवसेनेचे आदित्य ठाकरे, युवक चे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख ,आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारात सहभाग घेऊन विठ्ठल उर्फ नाना काटे यांना विजयी करण्याचा संकल्प केला आहे. मतदारांनी विठ्ठल उर्फ नाना काटे यांना भरभरून मते द्यावी व चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या विकासाकरिता नाना काटे यांना विजयी करावे, असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.
पुढे ते म्हणाले, “पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून येथे भ्रष्टाचार बोकाळला आहे, या भ्रष्टाचाराला आळा घालायचा आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलणे म्हणजे आत्ताच्या राज्यकर्त्यांच्या नाकारतेपणामुळे निवडणुका पुढे ढकलत चालले आहेत. या निवडणुका होणे आवश्यक आहे. सध्या पालिका अधिकाऱ्यांच्या ताब्यात शहराचा कारभार देण्यात आला आहे. परंतु सामान्य नागरिकांचे प्रश्न यामुळे सुटताना दिसत नाही, महापालिका निवडणूक होणे अत्यंत आवश्यक आहे.
“मी पालकमंत्री असताना रोज सकाळी सात वाजता कामाला सुरुवात करत होतो व पिंपरी चिंचवड पुणे, पुणे ग्रामीण या सर्व परिसराचा विकास करण्याच्या कामाच्या हेतूने अधिकाऱ्यांच्या बैठका चर्चा करून निर्णय घेत होतो व काम योग्य दिशेने सुरू आहे की नाही? याकडे माझे लक्ष असायचे. विकास कामे तडीस नेण्यास मी प्रामुख्याने प्राथमिकता देत होतो. परंतु सध्याचे पालकमंत्री असे करताना दिसत नाही.” अशी टीका अजित पवारांनी केली आहे.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, “अपक्षांचा विचार करू नका, असे अपक्ष येत असतात जात असतात, परंतु शेवटी आपल्या मतदार संघाचा विकास कोण करेल याचा विचार मतदारांनी करायला हवा. मतदार संघाचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध आहे व आम्ही सर्व विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या पाठीशी असून, मतदारांनी विठ्ठल उर्फ नाना काटे यांना निवडून द्यावे, असे अजित पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले.