शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
मोरेवस्तीमधील पाणी समस्या सोडविण्यासाठी मागील काही दिवसांपूर्वी 50 मीटर पाइपलाइन जोडून देखील कमी दाबाने आणि अनियमित पाणीपुरवठा होत आहे. मोरेवस्ती भागात मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग वास्तव्यास आहे. त्यांना सकाळी सहा ते आठ या वेळेत कामावर जावे लागत आहे. त्यामुळे महापालिकेने मोरेवस्ती परिसरात पुरेशा दाबाने आणि सकाळी सहा वाजता पाणीपुरवठा करावा, अशी मागणी यश साने यांनी केली आहे.
यश साने यांनी पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी रामनाथ टकले यांनी याबाबत निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, सकाळी पाणीपुरवठा केल्याने कामगार, नोकरदार तसेच महिला वर्गाची होणारी गैरसोय टाळण्यास मदत होणार आहे.
सध्या महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने चिंचेचा मळा, म्हेत्रेवस्ती आणि मोरेवस्ती भागात वेगवेगळ्या वेळेत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे सकाळी सात ते दहा आणि दहा ते साडेबारा अशा दोन टप्प्यात पाणीपुरवठा करण्यासाठी ट्रायल घेण्यात येत आहे. परंतु त्यामुळे कामगार नाक्यावर व इतर ठिकाणी कामावर जाणाऱ्या नागरिकांच्या नियोजनात बिघाड होत आहे. त्यांना पाण्यासाठी रोजगार बुडवून घरी बसण्याची वेळ येत आहे. त्यामुळे महापालिकेने जास्त दाबाने सकाळी सात ते बारा दरम्यान पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दोन दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे. तरी पाणीपुरवठा विभागाने याची दखल घेऊन पुरेशा दाबाने आणि नियमित पाणीपुरवठा करावा, असेही सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे.