शबनम न्युज | पुणे
अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारं, प्रेमाची व्याख्या समजून सांगणारं, अभिनेते रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांचा सुपरहिट ठरलेला चित्रपट वेड 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने तुफान कमाई केली. आता वेड हा चित्रपट हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे. आज जेनेलिया देशमुख हिने तिच्या इंस्टाग्राम वर या चित्रपटाचे टीझर रिलीज केले आहे. वेड हा (हिंदी भाषेतील) चित्रपट येत्या 28 एप्रिल रोजी डिज्नी हॉटस्टार वर प्रदर्शित करण्यात येणार आहे.
जेनेलियाने तिच्या इंस्टाग्राम वर या हिंदी भाषेतील चित्रपटाचे टिझर रिलीज केले आहे. या टिझर मध्ये ‘प्यार के पागलपन की, कोई सीमा नही होती’, ‘प्यार तूने भी किया प्यार मैने भी’ असे संवाद यामध्ये पाहायला मिळत आहे.
मराठी भाषेतील वेड चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले होते. या चित्रपटातील संगीत, पटकथा, संवाद, सिनेमॅटोग्राफी तसेच रितेश आणि जेनेलियाची भूमिका सर्वांना आवडली होती. या चित्रपटाच्या यशानंतर वेड हा चित्रपट हिंदी भाषेतही प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटात रितेश-जेनेलिया सोबतच अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी, शुभंकर तावडे, जिया शंकर या कलाकारांनी आपली भूमिका उत्कृष्ट पद्धतीने पार पाडली होती.
वेड या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः रितेश देशमुख यांनी केले होते. तसेच जेनेलिया ही मराठी चित्रपटात पदार्पण करीत होती. या चित्रपटातील संगीत संगीतकार अजय-अतुल आणि गुरु ठाकूर यांनी लिहिली होती.या चित्रपटातील गाण्यांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. येत्या 28 एप्रिल रोजी वेड (हिंदी भाषेतील) चित्रपट डिजनी हॉटस्टार वर प्रदर्शित करण्यात येणार आहे. या हिंदी भाषेतील वेड साठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.