पिंपरी: ऑटो रिक्षा चोरी करणाऱ्या टोळीला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण अंदाजे ७ लाख ७० हजार रुपय किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या भोसरी पोलिसांनी केली.
आर्यन प्रमोद भालेराव, सुमित भीम सूर्यवंशी (दोघेही रा. दापोडी पुणे), रिजवान रमजान मुलांनी (रा. परिवर्तन सोसायटी, चिखली पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून अंदाजे १ लाख ७० हजार रुपये किमतीची एक महागडी स्पोर्ट बाईक व अंदाजे ६ लाख रुपये किमतीच्या चार ऑटो रिक्षा असा एकूण ७ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, भोसरी पोलीस स्टेशन कडील एकूण ५ गुन्हे हे उघडकीस आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गेल्या काही दिवसांपासून अचानक ऑटो रिक्षा चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले, या चोरीच्या गुन्हाला आळा घालण्यासाठी भोसरी पोलिसांनी पथकाच्या सहाय्याने तपास सुरू केला. तपासादरम्यान त्यांना एका ऑटोरिक्षासह दोन संशयित जाताना दिसले. ऑटो रिक्षा थांबविण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी ऑटो रिक्षा सह जोरात पळ काढला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत त्यांना अटक केली. आरोपींचा तपास केला असता, त्यांनी चोरी केल्याचे स्पष्ट झाले. या घटनेचा अधिक तपास भोसरी पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार, पोलीस सह आयुक्त मनोज लोहिया, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त, परिमंडल विवेक पाटील, पोलीस आयुक्त पिंपरी विभाग प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, पोलीस उपनिरीक्षक मुकेश मोहरे तसेच सहाय्यक पोलीस फौजदार राकेश बोयणे, पोलीस अंमलदार सचिव गार्डे, नवनाथ पोटे, धोंडीराम केंद्रे, प्रतिभा मुळे, आशिष गोपी, संतोष महाडिक, तुषार वराडे, स्वामी नरवडे, सचिन सातपुते, सागर जाधव यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केली.