शबनम न्युज | बारामती
विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या मिश्किल स्वभावाची नेहमीच चर्चा असते. त्यामुळे अजित पवारांचं भाषण हा नेहमीच उपस्थितांसाठी उत्सुकतेचा विषय असतो. आज बारामतीमध्ये महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने एका कार्यक्रमात केलेल्या भाषणात अजित पवारांनी केलेल्या अशाच टोलेबाजीवर उपस्थितांनी दिलखुलास हसत दाद दिली.अजित पवारांनी यावेळी बारामतीमध्ये पाण्याची व्यवस्था करण्यासंदर्भात योजनेची माहिती दिली. “बारामतीला कॅनॉलला क्लोजर जरी आला तरी पाणी कमी पडलं नाही पाहिजे अशी व्यवस्था आपण करतोय. पण म्हणून पलटन वाढवू नका. एक-दोन अपत्यांवरच थांबा. नाहीतर काय अजित पवार देतोय, आहे देवाची कृपा वगैरे. तसं काही करू नका”, असं अजित पवार यावेळी म्हणाले. त्यांनी असं म्हणताच उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. असा सल्ला देताच उपस्थितांमध्ये एकच सुरु झाला.
यावेळी बोलताना अजित पवारांनी कोयता गँगबाबत स्थानिक पोलिसांना आदेश दिले आहेत. “माझी विनंती आहे. मी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सांगतोय. बारामतीमध्ये वेडेवाकडे प्रकार होत आहेत. काल-परवा पिंपरी-चिंचवडमधल्या कोयता गँगच्या क्लिप माझ्याकडे आल्या आहेत. काही मुलं दुकानात आली. दुकानात पाण्याची बाटली मागितली. पाण्याच्या बाटलीचे पैसे मागितले म्हणून ५-६ कोयत्यांनी धडाधड त्याच्या दुकानाच्या काचा फोडल्या. त्याबद्दल मी तिथले सीपी, पुण्याचे सीपी यांच्याशी बोलेन. मी या गोष्टी अजिबात खपवून घेणार नाही. रोज माझ्याबरोबर ऊठबस करणारा, जवळ बसणारा जरी चुकीचं वागला तरी तुम्ही त्याच्यावर कारवाई करा. काही घाबरायचं कारण नाही. माझे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी तुम्हाला आदेश आहेत”, असं अजित पवार म्हणाले.