शबनम न्युज | मुंबई
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर राजकीय वातावरणात एकच खळबळ सुरू आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कोण बनणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. शरद पवार यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. काल यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या बैठकीत या राजीनामा नाट्यवर चर्चा सुरू होती. विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे नाव अध्यक्षपदासाठी घेतले जात असतानाच खासदार सुप्रिया सुळे यांचेही नाव चर्चेत आहे. आता येत्या ५ मे रोजी अध्यक्ष पदाचा निर्णय होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
शरद पवार यांनीही एकूण अंदाज घेऊन अखेर निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी दोन-तीन दिवसांचा वेळ द्या, अशी कार्यकर्त्यांची समजूत घातली. त्यामुळे ५ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाच्या निर्णयावर निर्णय होणार आहे. सध्या शरद पवार यांच्या नंतर पक्षाचा अध्यक्ष कोण? यावर यशवंतराव प्रतिष्ठान मध्ये दिवसभर मंथन आणि बैठका सुरू होत्या. सुप्रिया सुळे यांच्याकडे दिल्लीची जबाबदारी आणि अजित पवारांकडे राज्याची जबाबदारी असे धोरण ठरल्याचे सांगण्यात येत होते. पण त्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. अखेर प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांचा राजीनामा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही, अशी माहिती प्रसार माध्यमांना दिली, तसेच अफवा पसरवू नका, असे आवाहन देखील केले.