शबनम न्युज | नांदेड
नागपूरहून माहूरला पोहचण्यासाठी लहानपणी आम्हाला आठ तास लागत. आज नागपूर ते माहूर हे अंतर अवघ्या अडीच तासात पार करणे सुकर झाले आहे. माझ्या आई-वडिलांची उतरत्या वयात जी इच्छा होती ती आता पूर्णत्वास येत असल्याने मला मनस्वी आनंद होत असल्याची भावना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. श्रीक्षेत्र माहूर गडावर अबाल वृद्धांसह दिव्यांग व सर्व भक्तांना सुकर ठरणाऱ्या लिफ्टसह स्कायवॉक बांधकाम योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी त्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
माहूर येथे आज त्यांनी सपत्निक परिवारासह श्री रेणुका देवीची पुजा करून माहूरच्या विकासाला व रोजगार निर्मितीला चालना देणाऱ्या महत्वाकांक्षी प्रकल्प श्रीक्षेत्र माहूरगड श्री रेणुका देवी मंदिर लिफ्टसह स्कायवॉकचे बांधकामाचे भूमिपूजन केले. माहूर गडाच्या पायथ्याशी या भूमिपूजन समारंभानिमित्त उभारण्यात आलेल्या मंचावरुन ते बोलत होते. यावेळी श्री रेणुका देवीसंस्थाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर, खासदार हेमंत पाटील, आमदार भिमराव केराम, आमदार राम पाटील रातोळीकर, आ. डॉ. तुषार राठोड, आ. शामसुंदर शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, किनवटच्या उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी नेहा भोसले, माहूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष फेरोज दोसानी, व्यंकटेश गोजेगावकर, श्री रेणुका देवीसंस्थाचे सर्व सन्माननिय ट्रस्टी सदस्य आदी उपस्थित होते.
सन २००४ साली एका अपघातात माझ्या पायाला चार फॅक्चर झाले होते. त्यानंतर मी दर्शनाला खुर्ची घेऊन गेलो होतो. आज गडावर मी श्री रेणुकादेवी मातेच्या दर्शनाला पायी गेलो. माझ्या आईला उरत्या वयात गडावर येऊन दर्शन घेणे सोपे नव्हते. भावनेचा हा धागा पकडत त्यांनी लिफ्टसह स्कायवॉक प्रकल्पाचे भूमिपूजन करतांना माझ्या मनात कृतज्ञतेच्या भावना अधिक असल्याचे त्यांनी प्रांजळपणे सांगितले.
तीर्थक्षेत्राच्या विकासासमवेत पर्यटन व अनुषंगिक सेवाक्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी निर्माण होते. तीर्थक्षेत्र व पर्यटनासाठी पहिली अट ही स्वच्छतेची असते. शेगाव, शिर्डी, तिरूपती हे तीर्थक्षेत्रातील स्वच्छतेचे आदर्श मापदंड असून माहूर हे तीर्थक्षेत्र सुद्धा स्वच्छतेच्या दृष्टीने नावाजले जावे यासाठी नगरपरिषदेने व माहूरच्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन मंत्री गडकरी यांनी केले.