शबनम न्यूज | मुंबई
भारत सरकारची तपास यंत्रणा कशाप्रकारे वापरल्या जातात, हे आपण देशभरात पाहतोय. त्याचा वापर पहिल्यांदा माझ्यावरच झाला, त्याआधी हे प्रकरण काय आहे? हे कोणाला माहित नव्हतं, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.
आयएल अॅण्ड एफएस कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार व संशयास्पद कर्जाचे वाटप केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज ईडी चौकशी होणार आहे. या चौकशीसाठी ते ईडी कार्यालयातही दाखल झाले आहेत. दरम्यान, यावरून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ते पुढे म्हणाले की, “वेळोवेळी देशभरामध्ये केवळ दबावासाठी मन मानेल अशा रितीने ईडीचा वापर केला जातोय. सुप्रिम कोर्टातही त्यादिवशी सांगण्यात आलं की भीती निर्माण करू नका. दहशतीचं वातावरण निर्माण करू नका. लोकशाही मार्गाने विरोध करणे, निषेध करणं एवढंच आपल्या हातात आहे. आमच्याकडून कोणतंही चुकीचं पाऊल उचललं गेलेलं नाही. कितीही वेळा त्यांनी चौकशी केली तरी काहीही निष्पन्न होणार नाही.”