शबनम न्यूज | पुणे
दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हाउसफुल झाल्याची दिसत आहे. नुकतेच या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला 6.45 कोटींचा गल्ला जमवला आहे, अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी दिली.
या चित्रपटाच्या पहिल्या आठवड्याच्या कमाईमुळे पहिल्याच आठवड्याअखेरीस हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा वर्षातला सुपरहिट मराठी चित्रपट ठरला आहे. या निमित्त केदार शिंदे यांनी एक पोस्ट शेअर करीत प्रेक्षकांचे आभार व्यक्त केले आहे.
पोस्टमध्ये केदार शिंदे म्हणतात, “ही स्वामींची कृपा. हा सिध्दीविनायकाचा महाप्रसाद. मला २१ वर्ष लागली दादरचा एक रस्ता क्रॉस करायला! २००२ साली सही रे सही आलं. त्याला तुम्ही मायबाप प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. गेली कित्येक वर्ष त्याचे “हाऊसफुल्ल” चे बोर्ड मी पाहातो आहे. त्यानंतर अनेक नाटकं, सिनेमे यालाही भरभरून प्रतिसाद दिलात. अगं बाई अरेच्चा, जत्रा ते महाराष्ट्र शाहीर पर्यंतच्या प्रवासात तुमची साथ लाखमोलाची ठरली. मात्र खऱ्या अर्थाने “सही” नंतर “बाईपण भारी देवा” चं हे यश पाहातो आहे. याला फक्त तुम्हीच कारणीभूत आहात. मी काम अविरतपणे सुरू ठेवेन. तुम्ही मात्र सोबत राहा. खुप भावना व्यक्त करायच्या आहेत. पण योग्य वेळी नक्कीच करीन”, असे केदार शिंदे यांनी म्हटले आहे.