शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरातील चिखली भागात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. या संदर्भात आज शहर शिवसेना संघटक भोसरी विधानसभेचे रावसाहेब चंद्रकांत थोरात व उपशहर प्रमुख नेताजी काशीद यांनी चिखली पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांची भेट घेतली. तसेच वाढत्या गुन्हेगारी संदर्भात लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली.
या प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन म्हटले की, तळवडे, रुपीनगर,सहयोग नगर, त्रिवेणी नगर, ताम्हाणे वस्ती, मेहत्रे वस्ती, मोरे वस्ती, चिखली भागात गुन्हेगारी वाढली आहे. या परिसरात अनेक मुले टोळीने चौकात बसलेले असतात, दारू पिऊन रोडवर धिंगाणा घालतात, मोठमोठ्याने गाडींचे आवाज करणे, गुटखा खाऊन रोडवर घाण करणे या सर्व प्रकाराला आळा बसण्यासाठी पोलिसांची गस्त, पेट्रोलिंग दिवसा व रात्री वाढविण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
तसेच महाराष्ट्रातील अनेक स्थानिक नागरिक भाडेतत्त्वावर रूम भाड्याने देतात.परंतु त्या भाडे करूचा कोणत्याही प्रकारे डाटा, माहिती, संपूर्ण कुटुंबाची आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो, मोबाईल नंबर घरमालक स्वतःकडे ठेवत नाही व पोलीस ठाण्यात ही देत नाहीत, तरी देशाच्या महाराष्ट्र राज्याच्या सुरक्षेसाठी आपल्या नागरिकांच्या सुरक्षितेसाठी संपूर्ण माहिती घर मालकाने रेंट एग्रीमेंट किंवा शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करावे किंवा महा-ई-सेवा केंद्रातून तहसीलदार यांच्यासह शिक्यासह संमती पत्र प्रतिज्ञापत्र सत्य माहिती व भाडेकरूंची संपूर्ण खरे कागदपत्रे चिखली पोलीस ठाण्यात जमा करावी, जेणेकरून कोणी अनुचित प्रकार केला तर पोलीस निरीक्षक यांना कारवाई करायला सोपे जाईल, अशी चर्चा यावेळी करण्यात आली, अशी माहिती नेताजी काशीद यांनी दिली.