पुणे : देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त युवानेते गौरव गणेश घुले यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात ५५५ जणांनी रक्तादान केले. बिबवेवाडी येथील कृष्णाई चौपाटीवर या शिबिराचे आयोजन केले होते. परिसरातील युवक व प्रौढ लोकांचा शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद लाभला. गौरव घुले यांच्या वतीने प्रत्येक रक्तदात्याला भेटवस्तू व सन्मानपत्र देण्यात आले. शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, माजी महापौर दत्ता धनकवडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेशशेठ घुले, पर्वती मतदार संघाचे अध्यक्ष संतोष नांगरे, शिवाजीभाऊ गदादे आदी उपस्थित होते.
दीपक मानकर म्हणाले, “रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. आज अनेकांना रक्ताची गरज भासते. समाजाच्या गरजा ओळखून गौरव घुले सातत्याने चांगले उपक्रम राबवत आहेत. परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासह राष्ट्राच्या निर्मितीमध्ये योगदान देत आहेत.” गौरव घुले म्हणाले, “रक्तदान शिबिराच्या माध्यमातून देशसेवा करण्याचा उपक्रम गेली अनेक वर्षांपासून राबवत आहोत. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अनेकजण उत्साहाने रक्तदान शिबिरात सहभागी होतात. यंदाही चांगला प्रतिसाद मिळाला.”