शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
ऑनलाइन पेमेंट करतो, असे सांगून पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील व्यावसायिकांना गंडा घालणाऱ्या बंटी आणि बबली या जोडीला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या, गुन्हे शाखा युनिट -4 ने अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण 6 गुन्हे उघड करून 300 ते 400 व्यावसायिकांना लुटल्याची निष्पन्न झाले आहे.
बंटी उर्फ गणेश शंकर बोरसे (वय 34, रा. पठारे वस्ती लोहगाव, पुणे) व त्याची पत्नी बबली उर्फ प्रिया गणेश बोरसे (वय 28) असे अटक करण्यात आलेल्या या बंटी आणि बबली जोडीचे नाव आहेत.
गणेश आणि प्रिया हे दोघे दुकानात जाऊन खरेदी करून पेमेंट ऑनलाइन करतो, असे सांगून ऑनलाइन पेमेंटचा ट्रांजेक्शन सक्सेसफुल असा खोटा स्क्रीनशॉट दाखवून त्यांची फसवणूक करायचा. आतापर्यंत या दोघांनी मिळून 300 ते 400 व्यावसायिकांना लुटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश आणि प्रिया हे दोघे काही ठिकाणी त्यांच्या दोन लहान मुलांसह जाऊन मागील दोन तीन वर्षापासून सर्व जीवनावश्यक वस्तू तसेच मोजमजेच्या वस्तू हे दोघे दुकानात जाऊन दुकानदाराशी गोड बोलून विश्वास संपादन करून, वस्तू खरेदी करत असे, काही व्यावसायिकांकडून खर्चासाठी रोख रक्कम नाही, असे सांगून रोख रक्कम देखील घेत. तसेच खरेदी केलेल्या वस्तूंचे बिल व रोख रक्कम असे मिळून ऑनलाईन पेमेंट आहे का? असे विचारून एनईएफटी द्वारे आयसीआयसीआय बँकेच्या बँकिंग अॅप द्वारे खोटे सक्सेस पेमेंट झाल्याचा स्क्रीन शॉट व्यवसायिकांना दाखवत होता. तसेच तो व्यवसायिकांना सांगत असे की, एनईएफटी द्वारे केलेले पेमेंट ही 24 तासाच्या आत येते जर पेमेंट आले नाही, तर तो त्यांना स्वतःचा मोबाईल नंबर देत असे व दुकानदारांना विश्वास बसवण्यासाठी त्याचे नंबर वर मिस कॉल मारण्यास सांगत होता. त्यानंतर दुकानदाराचा विश्वास बसल्यावर तो सामान घेऊन जात व बाहेर गेल्यावर लगेचच सदर दुकानाची मोबाईल नंबर ब्लॉक लिस्ट ला टाकत होता. त्यानंतर लगेचच मोबाईल मधून त्याचे नंबर चे सिम कार्ड काढून ठेवत असे.
त्यानंतर पुन्हा ज्यावेळी तो खरेदी करण्यास जात असे, त्यावेळी ते सिम कार्ड पुन्हा टाकत असे, तो जो मोबाईल नंबर दुकानदारांना देत होता. तो इतर व्यक्तीच्या नावावर होता. तसेच त्याने त्या नंबर वरून दोन वर्षांमध्ये एकाही व्यक्तीला आउटगोविंग कॉल केला नाही. तसेच तो वेळोवेळी नवनवीन सिम कार्डचा वापर करत असे तसेच त्याचे राहण्याचे ठिकाण देखील एक नव्हते, तसेच आपण पकडले जाऊ नये, म्हणून तो पुरेपूर काळजी घेत होता. पकडले जाऊ नये म्हणून त्याने बायकोला मोबाईल फोन वापरू दिला नाही. सदर आरोपी एफ वाय बी ए एस सी पर्यंतचे शिक्षण झाले असून, त्यांनी आतापर्यंत पेरू, आंबे, पाणीपुरी, किराणा, मेडिकल, केक, मसाले, हार, गादी, सायकल, लॅपटॉप, इलेक्ट्रिक वस्तू, स्टेशनरी, गिफ्ट हाऊस, नर्सरी अशा तीनशे ते चारशे व्यावसायिकांना फसवल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्याच्याकडून एकूण 6 गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच त्याची पत्नी प्रिया बोरसे हिला देखील अटक करण्यात आली असून, सदर गुन्ह्याचा तपास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट चार करीत आहेत.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनायक कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 4 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, सह पोलीस निरीक्षक सिद्धनाथ बाबर, पोलीस उपनिरीक्षक गणेश रायकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नारायण जाधव, संजय गवारे, दादा पवार ,आदिनाथ मिसाळ, आबासाहेब गिरणारे, प्रवीण दळे, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ, रोहिदास आडे, वासुदेव मुंडे, सुनील गुट्टे, सुरेश जायभाय, प्रशांत सहित, सुखदेव गावंडे, तांत्रिक विश्लेषण विभाग गुन्हे शाखा चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय तुंगार, सागर पानबंद ,नागेश माळी ,नितेश बीचेवार, पोपट हुलगे यांनी केली आहे.