शबनम न्यूज | जालना
मराठा आरक्षणासंदर्भात झालेल्या सर्व पक्ष बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काही शब्द व्हायरल करण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांसमोर “बोलायचं आणि निघायचं” असे वाक्य बोलले आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओ संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्पष्टीकरण दिले आहे.
ते म्हणाले, अशाप्रकारे संपादित व्हिडिओ व्हायरल करणे चुकीचे असून, ही आपल्या राज्याची संस्कृती नाही. जालन्यातील अंतरवाली सराटी गावात त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली असता, प्रसारमाध्यमांसमोर बोलताना व्हिडिओचे स्पष्टीकरण दिले. ‘माझ्या पोटात एक, अन ओठात एक; असं नसतं, असे ते म्हणाले.
मीडियाच्या लोकांनाही माझी विनंती आहे की, आमचा तुमच्यावर विश्वास आहे. परवा पत्रकार परिषदेचा एक व्हिडिओ चालवला. तुम्ही बरोबर शेंडा आणि बोडका काढला आणि बरोबर मधला दाखवला, पण पूर्ण सत्य असं होतं की, रात्री आमची दीड वाजेपर्यंत मीटिंग झाली. त्या मीटिंगमधून आम्ही पत्रकार परिषदेला येत होतो. तेव्हा देवेंद्रजी म्हणाले, आजच्या पत्रकार परिषदेत प्रश्न उत्तर नको मीही तेच म्हणालो, प्रश्नोत्तरे नको आणि राजकीय काही नको. मीटिंगमध्ये आपलं जे ठरलंय तेवढेच बोलायचं आणि निघायचं. आता यांनी पुढचं आणि मागचं काढलं आणि मधलच धरलं, असं मुख्यमंत्र्यांनी अक्षर करून दाखवलं.