शिवसेनेच्या ” ना नफा ना तोटा ” तत्त्वावरील शाडू मूर्ती खरेदीसाठी गणेशभक्तांची उडाली झुंबड..
लाखो गणेशमुतींची आज घरोघरी विधिवत स्थापना; शिवसेनेकडून नागरिकांचे आभार…
पिंपरी (दि. १९) :- राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे सर्वोसर्वा एकनाथजी शिंदे यांनी प्लास्टर ऑफ पॅरीसपासून (पीओपी) बनविलेल्या मूर्तीवर बंदी असल्याने या मूर्ती खरेदी करू नयेत, शाडू मातीच्या मूर्तीलाच गणेशभक्तांनी प्राधान्य द्यावे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे जनतेला नुकतेच आवाहन केले होते.
या आवाहनाला साद देत पिंपरी चिंचवड शहरातील गणेशभक्तांसाठी शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद यांच्या पुढाकरातून शहर शिवसेनेने ” ना नफा ना तोटा ” या तत्त्वावर पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेशमूर्ती मुबलक प्रमाणात बाजारपेठेत उपलब्ध करून दिल्या. त्यास गणेशभक्तांचा मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक गणेशभक्त, गणेश मंडळ यांनी या शाडू मातीच्या गणेशमूर्तींची आज विधिवत पूजन करुन स्थापना केली.
गणेशोत्सव म्हणजे लहान थोर यांच्यासाठी आनंदाची पर्वणीच असते. पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी शहर शिवसेनेने पिंपरी, चिंचवड, भोसरी या मतदारसंघात ठीक-ठिकाणी शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती गणेशभक्तांसाठी अल्पदरात उपलब्ध करून दिल्या होत्या. दगडूशेठ, सिंहासन, टिटवाळा, फेटा, मुकुट, अंभूजा अशा विविध छटा साकारलेल्या मनमोहक गणेशमूर्ती खरेदीसाठी गणेशभक्तांची झुंबड उडाली होती. मोठ्या आनंदात घरोघरी या मुर्त्यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यामुळे आज खऱ्या अर्थाने पर्यावरणाची हानी न होता इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा होण्यास शिवसेनेचा हातभार लागला आणि हे अभियान काही प्रमाणात यशस्वी ठरले, अशी माहिती शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद यांनी दिली.
''आपला उत्सव आनंदात आणि पर्यावरणाचे रक्षण करत साजरा करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. पक्षश्रेष्ठी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात शाडू मातीच्या मूर्ती बनविण्यासाठी पुढाकार घेतला. कच्चा माल, विविध साहित्य आणि त्यासाठी लागणारे मूर्तिकार यांची व्यवस्था केली. तयार गणेश मूर्ती भक्तांपर्यंत पोहोचविण्यासाठी महापालिकेचीही मदत मिळाली. त्या माध्यमातून स्टॉल व जागेचा प्रश्न सोडविला. पालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनीही त्यात योगदान दिले. गणेशभक्त, गणेश उत्सव मंडळ यांनी त्यास हातभार लावला. माझ्या राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी लोकांच्या सेवेत कार्यरत असणाऱ्या माझ्या सरकारला असेच लोकसेवा करण्याचे बळ मिळो, अशी प्रार्थना बाप्पाचरणी करून सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो''.. - मा. इरफानभाई सय्यद (शिवसेना उपनेते)...