गुन्हेगारी व वाहतुकीचे उल्लंघन टाळण्यासाठी पोलीसांना होतेय मदत;
आयुक्त शेखर सिंह यांनी घेतला विविध प्रकल्पांचा आढावा
शबनम न्यूज | प्रतिनिधी :
पिंपरी : शहरातील नागरिकांची सुरक्षा, गुन्हेगारी आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी आणि महानगरपालिकेच्यावतीने शहरामध्ये विविध ठिकाणी सुमारे ५ हजारहून अधिक कॅमेरे लावण्यात आले आहेत. सीसीटीव्ही कॅमे-यांचा पोलीस प्रशासनाला मोठया प्रमाणात फायदा होत असून गुन्हयांचा छडा लावण्यात यश येत आहे. वाहतुकीचे उल्लंघन करणा-या वाहनचालकांवर देखील याचा वचक बसून वाहतुक व्यवस्था सूरळीत ठेवण्यात मदत होणार असल्याची माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. तसेच, बीआरटी मार्गात नियमबाहय वाहने चालविणा-यांवर देखील बंदी घालण्यासाठी १० बीआरटी मार्गांवर लेन व्हायलेशन डिटेक्शन कॅमेरे बसविण्यात आले आहे. तसेच, सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांना ३५० हून अधिक गुन्हांचा तपास लावण्यात मदत झाल्याचेही त्यांनी सांगितले.
निगडी येथील आयसीसीसी सेंटर येथे आज, दि. २२ रोजी आयुक्त शेखर सिंह यांनी स्मार्ट सिटीमार्फत सूरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. तसेच, प्रकल्पांबाबत माहिती घेवून केंद्र शासनाने आखून दिलेल्या तारखेपर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. यावेळी, शहर अभियंता मकरंद निकम, सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सह शहर अभियंता मनोज सेठीया, बाबासाहेब गलबले, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे यांच्यासह प्रकल्प सल्लागार तसेच ठेकेदार कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी मार्फत सूरू असलेले अनेक प्रकल्प पूर्ण झाले आहेत. तर काही प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. ही सर्व विकास प्रकल्प शहराच्या नाव लौकिकात भर घालणारी नक्कीच ठरतील. मात्र, विकास प्रकल्प सूरू असताना अनेक समस्यांचा सामना प्रशासनाला करावा लागतो. त्यामुळे विकासात बाधा निर्माण होते. अशा समस्या निर्माण करणा-या मानसिकतांना वेळीच आवर घाला, असे सांगून विकासात आळा घालणा-यावर पोलीसात गुन्हे दाखल करा, अशा सूचना देखील त्यांनी अधिकार-यांना यावेळी दिल्या. दरम्यान, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन थांबविण्यासाठी व्हिडिओ आधारित गती उल्लंघन शोध प्रणालीची माहिती आयुक्त सिंह यांनी जाणून घेतली.
कॅमे-यांद्वारे वाहतुकीच्या वेगाची होणार नोंद…
वाहतुकीच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पीड व्हायलेशन डिटेक्शन सिस्टम सिंक्रोनाइज अवलंब करण्यात आला आहे. शहरात १६ ठिकाणी हे कॅमेरे लावण्यात आले असून सिग्नल ओलांडलेल्या वाहनांची नंबर प्लेट आणि वेग पकडण्याची क्षमता या प्रणालीमध्ये आहे. अतिवेगवान वाहनासाठी स्वयंचलितपणे अलार्म निर्माण करण्यास सिस्टीम सक्षम आहे. तसेच, वाहतुकीचे उल्लंघन केलेल्या वाहनाचा व्हिडिओ पुरावा कॅमेरा युनिट द्वारे कॅप्चर केला जाणार आहे. पुढे, एएनपीआर सिस्टीम कॅप्चर केलेल्या प्रतिमेवर प्रक्रिया करेल. त्यास अल्फान्यूमेरिक मजकूर/क्रमांकात रूपांतरित करून ई-चलन जारी करण्यासाठी त्याचा वापर केला जाईल. याव्यतिरिक्त, उल्लंघन कर्त्याची माहिती स्थानिक पातळीवर प्रदर्शित केली जाते.
रेड लाइट व्हायलेशन डिटेक्शन सिस्टम…
शहरातील २३ ट्रॅफिक जंक्शनवर लाल सिग्नलचे उल्लंघन रोखण्यासाठी ही प्रणाली तयार करण्यात आली आहे. याद्वारे लाल सिग्नलचे उल्लंघन करणार-या वाहनांचा फोटो घेवून त्याचे चलन तयार होईल. यामुळे, सिग्नलवरील झेब्रा क्रॉसिंगचे उल्लंघन थांबण्यास मदत होईल. लाल सिग्नलवरील सिस्टीमच्या कॅमेऱ्याद्वारे या सिग्नलवरील नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनांच्या नंबर प्लेटची नोंद घेवून संपूर्ण डेटा संकलित केला जाईल. सिग्नल, क्रॉसरोड आणि यू-टर्न वाहतूक पोलिसांशिवाय चालतील. पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्यांदाच हा प्रयोग सुरू होणार आहे. इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत वाहतूक व्यवस्था बदलण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. योजनेनुसार शहरात सीसीटीव्हीसह चार प्रकारचे विशेष कॅमेरे बसविण्यात आले आहेत.विशेष म्हणजे लाल सिग्नलवर वाहनांच्या गर्दीनुसार लाईटची वेळ आपोआप सेट होईल.
पब्लिक एड्रेस सिस्टीम…
पब्लिक अॅड्रेस सिस्टीम (पीए सिस्टीम) ही मायक्रोफोन, अॅम्प्लिफायर आणि लाउडस्पीकर असलेली इलेक्ट्रॉनिक ध्वनी प्रवर्धन वितरण प्रणाली आहे. ज्याचा वापर जनतेला संबोधित करण्यासाठी केला जातो. शहरात १० ठिकाणी माहिती प्रसार प्रणालीचा भाग म्हणून पीए सिस्टीम आधारित सार्वजनिक हिताच्या घोषणा करण्यासाठी या प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. ही प्रणाली आयसीसीसी सेंटरमधून व्यवस्थापित आणि नियंत्रित करण्यात येईल.
गाडयांचे नंबर प्लेट ओळखणार कॅमेरा…
एएनपीआर कॅमेरा हा नंबर प्लेट ओळखणारा कॅमेरा आहे. या कॅमेऱ्याचे वैशिष्टय़ म्हणजे तो वाहनांच्या नंबर प्लेट वाचून आपोआप चलन काढणे. एवढेच नाही तर कमांड कंट्रोल रूममध्ये बसलेले पोलीस या कॅमेऱ्याच्या मदतीने रस्त्यावर लक्ष ठेवून नियम मोडणाऱ्यांना चलन देऊ शकतात. एएनपीआर कॅमेरा गुन्हेगारांची छायाचित्रे घेतो आणि त्यात बसवलेल्या सॉफ्टवेअरच्या मदतीने गुन्हेगारांचे तपशील जवळपास तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना पाठवतो. याव्यतिरिक्त, ANPR कॅमेरे अॅक्सेस कंट्रोल सिस्टम स्वयंचलित करू शकतात. सुरक्षा प्रदान करू शकतात, कार चोरीला प्रतिबंध करू शकतात, विमा नसलेली वाहने शोधणे आणि वाहनांचे निरीक्षण, बेकायदेशीर पार्किंग तसेच वाहतूक व्यवस्थापन सुव्यवस्थित करू शकतात.