शबनम न्युज | पुणे
एमआयटी विद्यापीठातील ‘स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’चा विस्तार करीत नागपूर, पुणे आणि मुंबई येथे एमआयटी विद्यापीठाच्या माध्यमातून शासन पद्धतीविषयक अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल, हा अभ्यासक्रम एमाआयटीच्या विद्यार्थ्यांसोबत महाराष्ट्र विधानमंडळाच्या सदस्यांनाही उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केले.
एमआयटी विश्वशांती विद्यापीठ येथे ‘मास्टर्स इन पॉलिटीकल लिडरशीप ॲण्ड गव्हर्नमेंट’ या विषयावरील अभ्यासक्रमाच्या 19 व्या बॅचच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला विधानसभेचे विरोधी पक्षानेते विजय वडेट्टीवार, विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल कराड, आमदार सुनिल टिंगरे, माजी संसद सदस्य सुष्मिता देव, उल्हासदादा पवार, सचिन सावंत, डॉ. के. गिरीसन आदी उपस्थित होते.
श्री.नार्वेकर म्हणाले, महाराष्ट्र विधानमंडळ आणि एमआयटी विश्वशांती विद्यापीठाने सहयोगी कार्यक्रम राबवावा, जेणेकरून विद्यार्थ्यांना विधानमंडळ सदस्यांसोबत आंतरवासिता करता येईल आणि विधानमंडळ सदस्यांना विद्यापीठात या विषयातील कमी कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य होईल. या विद्यार्थ्यांमधून देशाला अभिमान वाटेल असे जागतिक नेतृत्व घडावे अशी अपेक्षा व्यक्त करून हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसोबत समाजाच्यादृष्टीनेही उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.