शबनम न्युज | सांगली
सामान्य माणसाला आरोग्य सेवेसाठी शासकीय रुग्णालये आधार वाटतात. यासाठी शासनाने शासकीय रुग्णालये व महाविद्यालयांमध्ये सर्व आवश्यक सेवा-सुविधा आणि यंत्र सामग्री उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य दिले आहे. शासकीय रुग्णालये व तेथील रुग्ण सेवांप्रती डॉक्टर्स, वैद्यकीय अधिकारी यांनी सजग राहून गरजू सर्वसामान्यांची आरोग्य सेवा करावी. यासाठी रुग्णालयास आणखी आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करुन देण्यास शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील विविध विभागांना भेट देवून केलेल्या पाहणीनंतर आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे डॉक्टर्स उपस्थित होते.
मुश्रीफ म्हणाले की, मिरज हे वैद्यकीय सेवा व उपचारांचे हब आहे. या ठिकाणी चांगल्या आरोग्य सेवा मिळतात, असा नावलौकिक आहे. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णास आपुलकीची वागणूक मिळाली पाहिजे, यासाठी शासकीय रुग्णालयातील प्रत्येक घटकाने योगदान देणे आवश्यक आहे. मिरज वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील आरोग्य सेवांच्या बळकटीकरणासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. सांगली येथील ५०० खाटांच्या रूग्णालयास निधी व मिरजेतील २५० खाटांच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी लवकरच मान्यता देण्यात येईल. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून रुग्णालयासाठी सर्जिकल साहित्य, औषधे खरेदी, विविध सेवा व यंत्र सामग्री उपलब्ध करुन दिल्याबद्दल वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी पालकमंत्री डॉ. खाडे यांचे अभिनंदन केले.