शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या एका जिम ट्रेनरला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा त्या पथकाने अटक केली आहे.
मिथुन सोपान मुंगसे (वय ३६, रा. चाकण, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा जिम मध्ये व्यायाम साठी जिम ट्रेनर आहे. याबाबत एका कॉलेज विद्यार्थ्यांनी फिर्याद दिली असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिम मध्ये फिर्यादी व त्याचे मित्रांमध्ये झालेल्या चर्चेतून फिर्यादीचा पेन ड्राइव हरवलेला असून, त्यात फिर्यादीचे पर्सनल फोटो व व्हिडिओ असल्याचे समजले. त्यातूनच आरोपी याने फिर्यादीस ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचा प्लॅन केला. हरविलेला पेन ड्राईव्ह मधील फिर्यादी यांचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडे ५ लाख रुपयांची खंडणी मागणी करून, पैसे दिले नाही तर मारून टाकण्याची देखील धमकी एका अनोळखी मोबाईल नंबर द्वारे आरोपीने दिली. वेगवेगळ्या मार्गाने भीती घालून 14 हजार रुपये घेतले. तसेच अजूनही पैशाची मागणी करत असल्याचे फिर्यादी यांनी तक्रारीत सांगितले. त्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी सदर तपास केला असता, सदरचा खंडणीचा गुन्हा उघडकीस आणला. आरोपीच्या विरोधात भा.द.वि. कलम ३८४, ३८६, ३८७, अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौभे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे ,अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे, पोलीस अंमलदार किरण काटकर, प्रदीप गोडांबे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, सुधीर डोळस व नागेश माळी यांच्या पथकाने केली.