शबनम न्युज | पिंपरी
भारत सरकारच्या महत्वाकांशी योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी केंद्र शासनाच्या विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ पिंपरी चिंचवड शहरात प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह,चिंचवड येथे नुकताच २८ नोव्हेंबर रोजी करण्यात आला होता. आज सदर यात्रेचे वाहन आकुर्डी येथे आले असता स्थानिक नागरिकांनी भेट देऊन शासनांच्या विविध योजनांची माहिती घेतली.
या कार्यक्रमास आमदार उमा खापरे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके,अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ.लक्ष्मण गोफणे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ.अंजली ढोणे,ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डाॅ.बाळासाहेब होडगर,डाॅ.गोविंदा नरके ,डाॅ.दिपक चौधरी,डाॅ.श्रध्दा कोकरे,उप आयुक्त मनोज लोणकर,क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे,विशेष अधिकारी किरण गायकवाड,नागरी सुविधा केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,पी.एच.एन.लता जगताप,शाहिन खान,सामाजिक कार्यकर्ते कैलास कुटे, समीर जवळकर, कैलास सानप, संजीव मंगोडेकर तसेच आकुर्डी,दत्तवाडी परिसरातील नागरिक उपस्थित होते.यावेळी आमदार उमा खापरे यांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या विविध कक्षांनाही भेट देऊन तेथील योजनांची माहिती घेतली.
आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या सुचनेनुसार आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजकुमार खोराटे, उल्हास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड शहरातील ६४ ठिकाणी हे वाहन भेट देणार असून प्रत्येक वॉर्डामध्ये २ ठिकाणी या वाहनासह नागरिकांना मार्गदर्शन करणारे विविध कक्ष केंद्र शासनाच्या विविध योजनांचे लाभ देण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या योजनांमध्ये आधार केद्र, आत्मनिर्भर स्वनिधी योजना,आयुष्मान कार्ड,महिला व बाल- कल्याण योजना,मागासवर्गीय कल्याणकारी योजना, दिव्यांग कल्याणकारी योजना तसेच इतर कल्याणकारी योजनांचा समावेश आहे.
महिला बालकल्याण मार्गदर्शन कक्षाद्वारे विविध योजनांतर्गत इ. ८ वी ते इ. १० वी मधील विद्यार्थीनींना सायकल घेणेकामी अर्थसहाय्य, सावित्रीबाई फुले पुरस्कार, निर्भया अस्तित्व पुनर्वसन योजना (पिडीत व अत्याचारीत मुलीला / महिलेला तिच्या पुर्नवसनासाठी अर्थसहाय्य), बेटी बचाओ बेटी पढाओ योजना – पहिल्या मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलेस अर्थसहाय्य, महिलांसाठी चार चाकी वाहन प्रशिक्षण यासह विविध योजनांचा समावेश आहे.
मागासवर्गीय कल्याणकारी योजनांमध्ये माता रमाई आंबेडकर योजनांतर्गत इयत्ता ५ वी ते इयत्ता १० वी मध्ये शिकत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजनांतर्गत मागासवर्गीय युवक / युवतींना परदेशातील उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य (प्रथम वर्षासाठी) यासह अशा विविध कल्याणकारी योजनांचा समावेश आहे.
दिव्यांग कल्याणकारी योजनांतर्गत दिव्यागांना एमएस-सीआईटी, डी.टी.पी, टॅली संगणक प्रशिक्षण तसेच महापालिका हद्दीतील दिव्यागांना प्रधानमंत्री आवास योजनांतर्गत घर खरेदीकामी १ लाख रकमेपर्यत अर्थसहाय्य, पिंपरी चिंचवड हद्दीतील मानव हिताच्या दृष्टिकोनातून काम करणाऱ्या मतिमंद, अंध, कुष्ठरोग, मुकबधीर, वृद्धाश्रम, अनाथालय अशा संस्थांना अनुदान अशा विविध योजनांचा समावेश आहे.
इतर कल्याणकारी योजनांतर्गत इयत्ता १० वी मध्ये ८० टक्के ते ९० टक्के गुण संपादन केलेल्या महाराष्ट्र राज्य मंडळ अंतर्गत शाळांमध्ये विद्यार्थी / विद्यार्थींनीना बक्षीस रक्कम, इयत्ता १२ वी मध्ये ८० ते ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या महाराष्ट्र राज्य मंडळ अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थी / विद्यार्थीनींना बक्षीस रक्कम देण्याबाबतच्या योजनांसहीत अनेक योजनांचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त आधार केंद्र कक्षाद्वारे नवीन आधार नोंदणी, नाव पत्त्यामध्ये दुरूस्ती, आधार लिंकींग, आयुष्मान कार्ड, आरोग्य विभागामार्फत माहिती आणि वैद्यकीय विभागातर्फे आजारांची तपासणी,तज्ञांचे मार्गदर्शन अशा विविध सुविधाही या विकसित भारत संकल्प यात्रा वाहनामार्फत नागरिकांना पुरविण्यात येणार असून या योजनांचा लाभ शहरवासीयांनी घ्यावा असे आवाहन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.