शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी चिंचवड परिसरात तळवडे येथील कारखान्यात झालेल्या आग दुर्घटनेत जखमी रुग्ण शिल्पा राठोड (वय ३१ वर्षे) यांचे ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरु असताना निधन झाले आहे. या घटनेतील मृतांची संख्या आता ९ झाली आहे. मयत शिल्पा राठोड यांना आयुक्त शेखर सिंह यांनी श्रध्दांजली अर्पण केली असुन कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली आहे.
तळवडे येथील आगीत ६ जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता. तर १० जण जखमी झाले होते. जखमींवर पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यापैकी उपचार सुरु असताना प्रतिक्षा तोरणे (वय १६ वर्षे) आणि कविता राठोड (वय ४५ वर्षे) यांचे निधन झाले. उर्वरीत ८ रुग्णांवर ससून रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यातील शिल्पा राठोड (वय ३१ वर्षे) यांचे आज (दि. १० डिसेंबर रोजी) निधन झाले आहे.
उर्वरित ७ रुग्णांवर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या रुग्णांच्या प्रकृतीविषयी आयुक्त शेखर सिंह विशेष लक्ष ठेवून आहेत. तसेच ते वेळोवेळी या रुग्णांच्या प्रकृतीबद्दल माहिती घेत आहेत. उपचारासाठी दाखल असलेल्या तळवडे आग दुर्घटनेतील जखमी रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक मदतीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ससून रुग्णालयामध्ये मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी आणि २ मदतनीस यांची २४x७ नेमणूक करण्यात आली आहे.