शबनम न्युज | नवी दिल्ली
संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेतील सुरक्षेमध्ये गंभीर चूक घडली असून, आज लोकसभेचे कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीमधून दोन जणांनी सभागृहात उडी मारली. तसेच या दोघांनी सभागृहातील बेंचवर उड्या मारून गोंधळ घातला. त्याबरोबरच त्यांनी सभागृहात स्मोक कँडल पेटवल्या. दरम्यान, या दोघांनाही पकडण्यात यश आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. याप्रकारामुळे अधिवेशनाचा कार्यक्रम दुपारी २ पर्यंत स्थगित करण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, तीन जणांनी संसद भवन परिसरामध्ये गोंधळ घातला असून, त्यांच्यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. यापैकी दोघांनी लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीमधून सभागृहात उड्या मारल्या. तसेच त्यांनी सभागृहातील बाकांवर उड्या मारून अध्यक्षांच्या आसनाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. तसेच सभागृहात स्मोक कँडल पेटवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, संसदेत गोंधळ घालणाऱ्या तरुणाचं नाव सागर असल्याचे समोर आले आहे. तर संसदेबाहेर स्मोक कँडल पेटवणारा अमोल शिंदे हा तरुण महाराष्ट्रातील लातूर येथील असल्याचे समोर येत आहे. तसेच त्याच्यासोबत असलेल्या महिलेचं नाव नीलम सिंह असल्याचे समोर येत आहे.