दक्षा ओक ठरली फारश्पिलेर्न बेस्ट स्टुडंट
तळेगाव दाभाडे, 1 जानेवारी 2024 (शबनम न्यूज नेटवर्क)
जर्मन-मराठी समान शब्दोच्चारांवरील प्रहसन, नाटिका, जर्मन गाणी आणि नृत्यरचनांचे अप्रतिम सादरीकरण करत तळेगाव दाभाडे येथील फारश्पिलेर्न अकॅडमीच्या मराठमोळ्या कलाकारांनी सादर केलेला ‘फारश्पिलेर्न ट्रेफेन’ हा स्नेहसंमेलन कार्यक्रम जल्लोषात साजरा केला.
कै. परांजपे कलापिनी नाट्यसंकुलात घेण्यात आलेल्या ‘फारश्पिलेर्न ट्रेफेन’ सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुभाषिक ब्राह्मण संघ मावळचे अध्यक्ष सुरेश साखवळकर होते. भारत सरकारच्या उपक्रमातंर्गत काम करणा-या डाड DAAD या सेवाभावी संस्थेच्या विभागीय अधिकारी गिरीजा जोशी, माजी नगराध्यक्ष अॅड. रवींद्र दाभाडे, दैनिक पुढारी वृत्तपत्राचे पत्रकार अमीन खान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले.
संस्कृतमुळे भारताचे जर्मनीशी सर्वाधिक जिव्हाळ्याचे नाते असल्याचे सांगून साखवळकर म्हणाले, की फारश्पिलेर्न अकादमीच्या संचालक ऋता वळवडे आणि श्रीधर वळवडे यांनी जर्मन भाषेच्या विद्यार्थ्यांच्या करिअरपूरक व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रमांची जोड देत मोफत मार्गदर्शन केले आहे. मराठी आणि जर्मनीमधील विद्यार्थ्यांकडून एकमेकांच्या संस्कृतीचे आदानप्रदान होत असून मराठी भाषक विद्यार्थ्यांनी करिअरमध्ये घेतलेली आंतरराष्ट्रीय झेप कौतुकास्पद आहे.
फोटो- ‘फारश्पिलेर्न ट्रेफेन’ कार्यक्रमास उपस्थित संपादक सुरेश साखवळकर, गिरीजा जोशी, पत्रकार अमीन खान, श्रीधर वळवडे आणि ऋचा मॅडम
भारतीय विद्यार्थ्यांना जर्मनीतील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणाच्या संधी मिळवून देण्यासाठी असलेल्या सेवाभावी संस्थेच्या कार्याची माहिती गिरीजा जोशी यांनी दिली.
फारश्पिलेर्न अकॅडमीच्या कार्याचा आढावा घेताना संचालक ऋचा वळवडे यांनी निसर्गाचे संवर्धन व श्रमदानाचे उपक्रम, मराठी-जर्मन भाषेतील सांस्कृतिक कला आणि जर्मन भाषिक देशांच्या अभ्यास सहली आदि उपक्रमांची माहिती दिली.
कु. रचना वळवडे आणि सहकारी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. श्रीधर वळवडे यांनी आभार मानले.
फारश्पिलेर्न बेस्ट स्टुडंट ऑफ अकॅडमी पुरस्कार प्राप्त विद्यार्थी:-
बेस्ट स्टुडंट: दक्षा ओक, थ्री पीलर्स अवार्ड: अंबरीश कुलकर्णी, हिमांशू जयस्वाल, अथर्व अरगडे. बेस्ट ग्रुप ऍक्टिव्हिटी:- चिन्मय जोशी, ऋतिका तोत्रे, मुग्धा साळवी, शताक्षी खांडेभरड, हर्षल बुजखुले, सायी जोशी, अमोघ वर्तले.