संपूर्ण स्वच्छता मोहीम अखंडपणे राबविणार – मुख्यमंत्री
शबनम न्युज | मुंबई
मुंबई शहरात संपूर्ण स्वच्छता मोहीम अखंडपणे राबवण्यात येत असून संपूर्ण स्वच्छता मोहीमेंतर्गत आज कुर्ला परिसरातील अनेक मंदिरांची स्वच्छता करण्यात आली. संपूर्ण स्वच्छता मोहीमेमध्ये स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. मुंबईत राबवण्यात येत असलेल्या संपूर्ण स्वच्छता (DEEP CLEAN) मोहीमेमुळे मुंबई शहरातील प्रदूषणाची पातळी घटली असून प्रदूषणाची पातळी 350 वरून 100 ते 80 पर्यंत खाली आली आहे. हे या संपूर्ण स्वच्छता मोहीमेचे यश असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत आज कुर्ला परिसरातील शिवसृष्टी येथील श्री गणेश मंदिर, श्री. नंदिकेश्वर मंदिर, श्री हेरंब मंदिर, सिद्धेश्वर सहकारी गृह निर्माण संस्था, श्री शनैश्वर मंदिर, चेंबुर येथे सपूर्ण स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार राहुल शेवाळे, आमदार मंगेश कुडाळकर, माजी आमदार तुकाराम काते, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, उपायुक्त (परिमंडळ – 5) हर्षद काळे, उपायुक्त ( घनकचरा व्यवस्थापन) संजोग कबरे, सहायक आयुक्त धनाजी हेर्लेकर, अलका ससाणे उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, संपूर्ण स्वच्छता मोहीम ही एक जन चळवळ झाली आहे. टप्प्या टप्प्याने संपूर्ण स्वच्छता मोहीम राज्यात राबवण्यात येत असून या मोहीमेच्या माध्यमातून लवकरच राज्य स्वच्छ, सुंदर व हरित होण्यास मदत होणार आहे. या अभियानामध्ये लोक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचा संदेश दिला आहे. 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या आयोध्या येथील श्री राममूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने देशभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. त्याला देशातील सर्व नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. यामुळे संपूर्ण स्वच्छता मोहीमेला गती मिळाली आहे. मुंबईतही अनेक मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. आज कुर्ला येथील अनेक मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या स्वच्छता मोहीमेचे खरे हिरो हे स्वच्छता कर्मचारी आहेत. दिवस रात्र हे कर्मचारी मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी काम करत असल्याचेही सांगून मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.