शबनम न्युज :प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड : मावळ लोकसभेचे प्रथम संसदरत्न खासदार स्वर्गीय गजानन बाबर यांच्या जीवन चरित्रावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे संपन्न होत आहे.
स्वर्गीय गजानन बाबर यांच्या जीवन चरित्रावर आधारित असणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार तसेच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या शुभहस्ते होत आहे.
या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार सचिन अहिर , माजी आमदार महादेव बाबर, माजी आमदार विलास लांडे ,माजी आमदार मदन भोसले, माजी महापौर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आझम भाई पानसरे तसेच माजी महापौर , मावळचे शिवसेना पक्षाचे संघटक संजोग वाघेरे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
किकली ते दिल्ली, व्हाया पिंपरी-चिंचवड’ असा खडतर प्रवास करत जवळपास ४५ वर्षांची राजकीय कारर्कीर्द गजानन बाबर यांनी यशस्वीपणे पूर्ण केली. शिवसेनेच्या माध्यमातून बाबर यांनी पिंपरी पालिकेचे तीन वेळा नगरसेवक म्हणून प्रतिनिधीत्व केले. या कालावधीत ते पालिकेतील विरोधी पक्षनेतेही होते. हवेली विधानसभा मतदारसंघातून ते सलग दोन वेळा आमदारपदी निवडून आले. मावळ लोकसभेची निर्मिती झाल्यानंतर मावळचे पहिले खासदार म्हणून गजानन बाबर यांची नोंद झाली. भुईंज (सातारा) येथील किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे संचालक तसेच उपाध्यक्ष म्हणून बाबर यांनी जवळपास १५ वर्षे समर्थपणे जबाबदारी पार पाडली. सातारा असो की पुणे, पिंपरी-चिंचवड, या संपूर्ण प्रवासात बाबर यांनी लोकहितासाठी व नागरी प्रश्नांसाठी शेकडो आंदोलने केली. बाबर यांचे संपूर्ण आयुष्यच संघर्षमय राहिले. राजकीय, सामाजिक पातळीवर बाबर कायम केंद्रस्थानी राहिले.
गजानन बाबर यांच्या जन्मापासून ते निधनापर्यंतच्या प्रवासाचा सविस्तर व सचित्र आढावा घेणारे हे पुस्तक प्रसिध्द करण्यात येत आहे. पुणेस्थित लेखक व पत्रकार तानाजी गोरे लिखित या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार तसेच संजय राऊत यांच्या हस्ते सोमवारी (२६ फेब्रुवारी) होणार आहे.
या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी हजेरी लावावी असे आवाहन शिवसेना मावळ लोकसभा मतदार संघ तसेच पिंपरी चिंचवड शहरातील सर्व संघटना यांच्या वतीने माजी नगरसेवक प्रकाश बाबर, श्री गजानन लोकसेवा सहकारी बँकेचे अध्यक्ष योगेश बाबर, उद्योजक धीरज बाबर उद्योजक अमित बाबर, शिवसेनेचे युवा नेते तथा उद्योजक सुरज बाबर व उद्योजक सुमित बाबर यांनी केले आहे.