शबनम न्युज : प्रतिनीधी
पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी संधी हवी
पुणे : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक कल्पना माझ्याकडे आहेत. वाहतुकीची समस्या, सुरळीत पाणीपुरवठा, मेट्रोचा विस्तार, पार्किंग व्यवस्था, औद्योगिक सामाजिक बांधीलकी (सीएसआर) निधीतून शाळांचे सक्षमीकरण, स्वच्छता मोहीम, कौशल्य विकास अशा अनेक गोष्टींवर लोकसहभागातून काम करण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी पुणे लोकसभा मतदार संघातून आपल्याला उमेदवारी मिळावी, अशी इच्छा ‘फ्रेंड्स ऑफ बीजेपी’च्या माध्यमातून काम करणारे शिवाजी माधवराव मानकर यांनी व्यक्त केली.
“पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यावर, सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासह मेट्रोचा विस्तार, रिंग रोड प्रकल्प पूर्ण होण्यासाठी प्रयत्न, स्वच्छ शहर व महापालिकेच्या शाळांचे सक्षमीकरण, पुण्याचा आत्मा असलेल्या मुळा-मुठा नदीचे संवर्धन, केंद्र शासनाच्या योजनांच्या माध्यमातून महिला, तरुण यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासह इतर अनेक योजनांवर आपण करत आहोत. पुण्यात औद्योगिक कंपन्या मोठ्या प्रमाणात असून, त्यांच्याकडे हजारो कोटींचा सीएसआर निधी उपलब्ध असतो. हा सीएसआर निधी, लोकांचा सहभाग यातून अनेक प्रकल्प व उपक्रम मार्गी लावण्यावर आपला भर असणार आहे,” असे मानकर म्हणाले.