शबनम न्यूज ( तळेगाव दाभाडे ) प्रतिनिधी :
महाशिवरात्री निमित्त प्राचीन शिवकालीन श्री बनेश्वर महादेव मंदिर येथे शुक्रवार, दिनांक – ०८ मार्च २०२४ रोजी पहाटे ५ वाजता महादेवाचा अभिषेक सरसेनापती श्रीमंत सरदार अंजलीराजे दाभाडे सरकार (मा.नगराध्यक्षा- तळेगाव दाभाडे नगरपरिषद), सरसेनापती श्रीमंत सरदार श्री.चंद्रसेनराजे दाभाडे सरकार, सरसेनापती श्रीमंत सरदार श्री .सत्येंद्रराजे दाभाडे सरकार (मा.उपनगराध्यक्ष- तळेगाव दाभाडे नगरपरिषद), सरसेनापती श्रीमंत सरदार श्री.सत्यशीलराजे दाभाडे सरकार यांच्या हस्ते होणार आहे.
रात्री ९.३० वाजता महाआरती व रात्री १० नंतर एकतारी भजनाचा कार्यक्रम होणार आहे. सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत पारंपारिक पद्धतीने सनई चौघडाचे वाद्य वाजन श्री भाऊसाहेब शिंदे हे करणार आहेत.
शनिवार, दिनांक – ०९ मार्च रोजी दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन केले आहे. महाप्रसाद श्री. राजूभाऊ सरोदे (मा. सभापती शिक्षण मंडळ तळेगाव दाभाडे नगरपरिषद) यांच्या तर्फे देण्यात आला आहे. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई चैतन्य इलेक्ट्रिकल्स (जिजामाता चौक) रणजित मखामले यांच्या तर्फे करण्यात आली आहे.
बनेश्वर नावाची पुणे जिल्हात २ शिवमंदिरे आहेत त्यातील एक म्हणजेच तळेगाव दाभाडे येथील मंदिर. या मंदिराचे बांधकाम हे शुर पराक्रमी सरसेनापती श्रीमंत सरदार श्री खंडेराव दाभाडे सरकार यांच्या काळातले आहे. मंदिराचा आजुबाजुचा परिसर हा शेती तसेच मनुष्य वस्तीचा असला तरी मनाला शांती व नवचैतन्य देणारा आहे. गेट मधुन आत प्रवेश करताच समोर नंदीमंडप दिसतो. चार खांबावर उभा असलेला नंदी खुप सुरेख असून लक्ष वेधुन घेईल अशीच त्याची घडण आहे. तसेच याच नंदिमंडपा शेजारी लागुन छोटे बांधीव तळे म्हणा अथवा पुष्करणी त्याची रचना सुद्धा खुप छान बांधीव दगडानी घडवलेली आहे. बनेश्वर मंदिराची रचना ही १६ खांबावर केलेली आहे. संपुर्ण दगडात उभारलेली मंदिराची रचना व त्यावर केलेले रंग काम तुम्हाला मोहात पाडायला मजबुर करते . यातील कोणत्याच खांबावर नक्षी काम नाही पण त्याची रचना बघण्या सारखी आहे. छोट्या प्रवेशद्वारातुन आत गेल्यावर डाव्याबाजुला कोनाड्यात देवीची व उजव्या बाजुच्या कोनाड्यात श्री गणेशाची मुर्ती दिसते . तर मंदीराच्या सभामंडपात एक नगारा देखिल आहे. हे सगळे बघुन जेव्हा आपण मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करतो तेव्हा नवचैतन्याची अनुभती येते .
बनेश्वर मंदिरात वर्षभर अनेक धार्मिक कार्यक्रम चंदन उटी सोहळा, त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त दीपोत्सव साजरे केले जातात. दर सोमवारी महादेवाची विविध रूपातील पूजा बांधली जाते.
महाशिवरात्री निमित्त कार्यक्रमाचे आयोजन श्री बनेश्वर सेवा मंडळ व संतोष मारुती उर्फ छबुराव भेगडे (शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, तळेगाव दाभाडे शहर, सदस्य – पुणे महानगर नियोजन समिती PMRDA यांनी केले आहे.