शबनम न्युज | मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटातील अनेक आमदार शरद पवार गटात परत येण्यास इच्छुक असल्याचे वक्तव्य शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी केले आहे. लोकसभेवेळी भारतीय जनता पार्टीचा अजित पवार गटावर मोठा दबाव आहे, असे असताना भाजपावाले विधानसभेला काय करतील? असा खोचक प्रश्न देखील रोहित पवार यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
नुकतेच आमदार निलेश लंके यांनी शरद पवार यांची भेट घेऊन पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर आमदार निलेश लंके शरद गटात प्रवेश करण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. निलेश लंके यांना असा प्रश्न विचारण्यात आल्यावर ते म्हणाले, “शरद पवार सांगतील, तो आदेश” त्यामुळे लंके परत शरद पवार गटात परतणार असे निश्चित मानले जात आहे. यानंतर आता आमदार रोहित पवार यांनी देखील अनेक आमदार त्यांची संपर्कात असल्याचे सांगितले आहे.
रोहित पवार म्हणाले, अजित पवार गट जागावाटपात स्वतः निर्णय घेतो की नाही हे मला सांगता येणार नाही. अजित पवारांच्या पक्षातील आमदार चिंतेत आहेत. तसेच अनेकजण परत येण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्या गटातील नेत्यांचं सोडा, कारण त्यांच्यावर आमच्या पक्षाने कारवाई केली आहे. त्यामुळे ते परत येऊ शकणार नाहीत आणि आले तरी शरद पवार त्यांना पक्षात घेणार नाहीत. त्यांच्या आमदारांबद्दल बोलायचं झाल्यास काहीजण परतण्यास इच्छूक आहेत. कारण त्या आमदारांना वाटतंय की, आत्ता लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाचा इतका दबाव असेल तर विधानसभेला तर ते आपल्याला भाव पण देणार नाहीत. त्यामुळे इथे राहून आपलं नुकसान का करावं? हाच विचार करून बरेच आमदार शरद पवारांकडे येतील. आता त्याची सुरुवात झाली आहे.