शबनम न्युज | पुणे
महायुतीतून शिरूर मध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र राष्ट्रवादीमध्ये त्यांना प्रवेश करावा लागणार म्हणून राष्ट्रवादीचे नेते दिलीप मोहिते पाटील यांनी विरोध केला आहे. शिवाजीराव पाटील यांनी भेट घेऊन देखील त्यांचा विरोध कायमच आहे. त्यामुळे आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीप मोहिते पाटील यांची भेट घेतली. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी ही भेट घेतली असल्याचे सांगण्यात आले आहे.
यावेळी आयोजित बैठकीतून अजित पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळेस मार्गदर्शन करत असताना अजित पवारांच्या नावाने मुख्यमंत्री होण्याच्या घोषणा देण्यात आल्या. त्यावेळी अजित पवार यांनीही कार्यकर्त्यांच्या घोषणांना प्रतिसाद देत ‘जेव्हा दिलीप मोहिते मंत्री होतील, तेव्हा अजित पवार मुख्यमंत्री होईल,’ असे विधान केले.
शिरूर मतदार संघातील निवडणूक रंगतदार होणार असून खासदार अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील असा सामना रंगण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आज शिरूर मधील खेड मतदार संघाचा दौरा केला. तसेच राष्ट्रवादीचे नेते दिलीप मोहिते पाटील यांची देखील भेट घेतली.