पंतप्रधान मोदींसाठीच्या ‘दिग्विजय पगडी’ पगडीने वेधले लक्ष !
‘पगडी निर्मिती ठरली रोमांचक क्षण’ :गिरीश मुरुडकर
शबनम न्युज : प्रतिनिधी
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील रेसकोर्स येथे सभेला संबोधित करताना परिधान केलेली खास ‘दिग्विजय पगडी‘ लक्षवेधी ठरली.’पाहताक्षणी डोळ्यात भरणारी ही पगडी पारंपारिक पुरातन पद्धतीने तयार केली होती आणि ही निर्मिती प्रक्रिया आमच्यासाठी रोमांचक क्षण ठरली’अशा भावना मुरडकर झेंडेवाले यांच्यातर्फे गिरीश मुरुडकर यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केली.
महायुतीचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी या पगडी निर्मितीची जबाबदारी मुरुडकर झेंडेवाले यांना दिली होती.त्यानुसार गिरीश मुरुडकर,अनुराधा मुरूडकर आणि यश मुरुडकर यांनी ही अनोखी निर्मिती साकारली होती.पंतप्रधान मोदी यांचे पुण्यात आजवर विविध पगडी घालून स्वागत करण्यात आले असून यंदाची पगडीही चर्चेचा विषय ठरली .
याबाबत माहिती देताना गिरीश मुरुडकर म्हणाले, ‘ऐतिहासिक मराठा शौर्याची साक्ष देणाऱ्या, मोत्यांचा तुरा असलेल्या, शुभचिन्हे लावलेल्या आणि पंचधातूंनी सजवलेल्या या विशेष पगडीच्या शीर्षस्थानी तुळजाभवानीची प्रतिमा होती. दिग्विजयाला साजेशा सात घोड्यांच्या मंचाची संकल्पना यातून प्रतीत होत होती. त्यामुळे तिला दिग्विजय योद्धा पगडी नाव दिले गेले आणि ती लक्षवेधी ठरली.उन्हाळा लक्षात घेऊन सुसह्य ठरणारी बांधणी करण्यात आली होती.अशा कलात्मक आणि जबाबदारीच्या निर्मितीसाठी किमान १५ दिवस विविध संकल्पना,साहित्य यावर काम सुरु असते.’
मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘पंतप्रधान मोदी यांचे आजवर अनेक पुणे दौरे झाले, त्यात त्यांचे विविध पगड्या घालून स्वागत केले गेले. पण दिग्विजय पगडी निश्चितच विशेष ठरली. दिग्विजयाची साक्ष देणारी ही पगडी मराठी परंपरेचा बाज आणि शौर्य दर्शविणारी होती.’