शबनम न्युज | पुणे
राज्यात ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिम अर्थात एमआयएम पक्षाच्या विस्तारावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून विधानसभा आणि महापालिका निवडणुकात पक्षाची शहरातील ताकद दिसेल, असे पुणे लोकसभा मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार अनिस सुंडके यांनी म्हटले आहे. अनिस सुंडके यांच्या प्रचारासाठी एमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांची 7 मे रोजी पुण्यात सभा आयोजित करण्यात आली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच सभेचे ठिकाण अजून निश्चित करण्यात आले नाही.
ते म्हणाले, विधानसभा, महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आतापासून काम सुरू केले आहे. पुणे शहरात एमआयएमचा एक आमदार आणि महापालिकेत 30 नगरसेवक निवडून आणण्याचे उद्दिष्टे आहे. त्या दृष्टीने मुस्लिम समाजातील लोकसभा निवडणुकीत ओबीसी यांनी माझ्यावर विश्वास ठेवून उमेदवारी दिली. मुस्लिम मतांचा वापर फक्त निवडणुकीसाठी केला जातो. मुस्लिम समाजातील प्रश्न, समस्या, शिक्षण, बेरोजगारी अशा मूलभूत बाबींकडे दुर्लक्ष केले जाते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने मुस्लिम समाजातील कार्य करण्याचा वापर फक्त राजकारणासाठी केला. तसेच मुस्लिम समाजाच्या मागण्यांकडे कायम दुर्लक्ष केले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने मला कामाची संधी दिली. नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून काम करताना मी कायम जात धर्माच्या पलीकडे जाऊन काम केले. तसेच स्थायी समितीचे अध्यक्ष असताना पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासाठी जागा मंजूर करण्यात आली. भवानी पेठेतील रफी अहमद किडवाई शाळा बांधण्यात आली, असे सुनके यांनी यावेळी म्हटले.