शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.३१ मार्च) :- तृतीय पंथीयांना सन्मानाने जगता यावे यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. त्यासाठी २०२२-२३ च्या अर्थ संकल्पात तृतीय पंथी व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी र.रु. २५ लाख इतकी तरतूद करण्यात आलेली असून त्यांचेकरीता रोजगार उपलब्ध झाला तर तृतीय पंथी सन्मानाने जगू शकतात यासाठी नामांकीत
संस्थेमार्फत त्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या स्वयंरोजगारांच्या संधी उपलब्ध करुन देणार आहे असे प्रतिपादन
आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे आंतरराष्ट्रीय तृतीय पंथी ओळख दिवसाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी समाजकल्याण विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, अतिरिक्त आयुक्त जिंतेद्र वाघ,
उप आयुक्त् अजय चारठाणकर , विधी सेल प्राधिकरणाचे अॅड. सचिन राऊत, सहाय्यक उप प्रादेशिक परिवहन
अधिकारी पवन नव्हाडे,समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक तसेच तृतीय
पंथी प्रतिनिधी लक्ष अरोरा, सोनाली दळवी तृतीय पंथीय ,सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
आयुक्त राजेश पाटील म्हणाले आज तृतीय पंथी ओळख दिवस साजरा करता असताना आनंद होत आहे. अशा
प्रकारे हा दिवस साजरा करणारी ही पहिलीच महानगरपालिका आहे. तृतीय पंथीसमाजाला सर्व सामान्यासारखे जगता
यावे आणि रस्त्यावर , सिंग्नलवर अशा ठिकाणी भिक्षा सारख्या मार्गाचा अवलंब न करता त्यांना नोकरी किंवा
स्वयंरोजगार उपलब्ध करता यावा यासाठी महापालिकेने विविध योजना तयार केलेल्या असून त्याची लवकरच
अंमलबजावणी होणार असल्याचे सांगितले.
समाजकल्याण विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेने तृतीय पंथी ओळख
दिवसाचे आयोजन केल्याबद्दल तसेच तृतीय पंथी समाजाला आत्मनिर्भर करण्यासाठी आणि सन्मानजनक स्थान निर्माण
करण्यासाठी करण्यात येणाऱ्या रोजगारासारख्या संधी उपलब्ध करुन देणार असलेबाबत महापालिकेचे आभार मानले.
तृतीय पंथीयांनी त्यांच्या समस्याबाबत समाजकल्याण विभागाकडे लेखी स्वरुपात मागण्या दिल्यास त्याबाबत निर्णय
घेण्यात येईल असेही ते म्हणाले.
पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी तृतीय पंथीय व्यक्ती हया समाजातील घटक असून त्यांना सर्व
सामान्यासारखी वागणूक मिळाली पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. पोलीस प्रशासनामार्फत याबाबत सहकार्य
करण्यात येईल असे त्यांनी सांगीतले.
समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे यांनी प्रस्ताविकामध्ये सांगितले की, आम्हाला माणूस म्हणून
जगायचा अधिकार दया या हक्कासाठी तृतीय पंथी समाज वर्षानुवर्षे झगडतोय, पण खरी गरज आहे ती समाजाने निरोगी
मनान त्यांना आपले म्हणण्याची. आज यातील काही तृतीय पंथी व्यक्ती वेगवेगळया क्षेत्रात उच्प्रच पदावर प्रतिनिधीत्व
करीत आहेत. जोयीता मंडल या सर्वोच्च न्यायालयातल्या पहिल्या तृतीय पंथी न्यायाधीश आहेत. तसेच शबनम मौसी या
मध्यप्रदेशात पहिल्या तृतीय पंथी आमदार आहेत तर मधु किन्नर या छत्तीसगढमध्ये रायगड महानगरपालिकेतील पहिल्या
महापौर आहेत ही अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिनानिमित्त रूपा टाकसाळ, फिदा खान, किरण पवार, प्रिती पिसाळ इशिता
यांना प्रातिनिधिक स्वरुपात जिल्हाधिकारी, पुणे यांच्या कार्यालयाकडून प्राप्त ओळख प्रमाणपत्राचे वाटप मान्यवरांच्या
हस्ते करण्यात आले.
यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या तृतीयपंथीयांचा सन्मान करण्यात आला त्यामध्ये महाराष्ट्रातील पहिले ट्रॉन्स जेंडर हेल्थ क्लिनीकचे लक्ष अरोरा, तृतीयपंथी तक्रार निवारण समितीच्या सोनाली दळवी, पोलीस मित्र संघटनेच्या उपाध्यक्ष निकीता, LGBTQ सपोर्ट ग्रुप चे संस्थापक अनिल उकरंडे, मंथन फॉउंडेशनचे अध्यक्ष आशा भट, शोधारंभ रिसर्च ऍन्ड डेव्हलपमेंटचे प्रोजेक्टअसोसिएट आणि समुपदेशक रुपा टाकसाळ,आयटीया शिक्षक अनु व दामिनी, नारी संस्थेमधील विजया वसावे,आधार संस्था संस्थापक दलजित गुरु, त्याच प्रमाणे संयोजक अनिल मोरे यांचा समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे आणि आयुक्त राजेश पाटील यांचे हस्ते स्मृतीचिन्ह व वृक्ष रोप देऊन
सन्मानीत करण्यात आले.
भारती हॉस्पिटलच्या डॉ.ज्योती शेट्टी यांनी तृतीयपंथी समाज आणि मानसिक आरोग्य याविषयावर मार्गदर्शन
केले. तर मित्र क्लिनिकच्या डॉ. कांचन पवार यांनी सर्वसमावेशक आरोग्य सुविधांबाबत माहिती दिली. फिरोज मुजावर
यांनी त्यांच्या नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक समाजविकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे यांनी सुत्रसंचालक प्रफुल्ल पुराणिक यांनी केले,
तर आभार उप आयुक्त अजय चारठाणकर यांनी मानले.