शबनम न्युज | पिंपरी
राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीला अक्षरश: धूळ चारली. ही विजयाची घोडदौड पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतही कायम राहील, असा विश्वास भाजपा संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी व्यक्त केला.
राज्यसभेच्या राज्यातील ६ जागांसाठी शुक्रवारी निवडणूक झाली. भाजपाकडून अनिल बोंडे, पीयूष गोयल आणि धनंजय महाडीक विजयी झाले आहे. ६ व्या जागेसाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना उमेदवार संजय पवार यांना रिंगणात उतरवण्यात आले होते. मात्र, भाजपाने तीनही जागा जिंकल्या आहेत.
अमोल थोरात म्हणाले की, भाजपाची विधानसभेत १०६ मते असताना भाजपाने ६ व्या जागेसाठी उमेदवार दिला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत महाविकास आघाडीची ९ मते भाजपाच्या उमेदवाराला मिळाली. धनंजय महाडीक यांना शिवसेना उमेदवार संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त मते मिळाली, हा महाविकास आघाडीचा मोठा पराभव आहे.
तसेच, आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी आजारी असतानाही मतदान केले. राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वत: हा भाजपाचा विचार आमदारांनी आपल्या कृतीतून सिद्ध करुन दाखवला. आमदार जगताप यांच्या कर्तव्यनिष्ठेमुळे पिंपरी-चिंचवडसह राज्यभरातील भाजपा कार्यकर्त्यांना आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे.
प्रभागनिहाय बैठकांचे नियोजन…
पिंपरी-चिंचवड शहरात आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्त्वाखाली प्रभागनिहाय बैठका घेण्यात येणार आहेत. बूथ सक्षमीकरण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सुरू केलेल्या विविध योजना व विकासकामे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. राज्यसभा निवडणुकीतील विजयाची घोडदौड पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतही पहायला मिळणार आहे, असेही अमोल थोरात यांनी म्हटले आहे.