शबनम न्युज | चिंचवड
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यांनतर अश्विनी जगताप म्हणाल्या, “माझ्या पतीने चिंचवड मतदारसंघात केलेले उल्लेखनीय कार्य आणि पिंपरी-चिंचवडचा सर्वांगीण विकास पाहता, माझी निवडणूक बिनविरोध व्हावी, याकरीता विरोधी पक्षांनी सकारात्मकता दाखवावी,” असे आवाहन माध्यमांशी बोलताना त्यांनी केले. स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर या जागेवर भाजप पक्षाच्या वतीने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही निवडणूक २६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यावेळी भाजपच्या वतीने मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “मी सहानुभूतीची लाट शोधत नाही, माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लोक कसे आले ते पहा, लोकांसाठी आणि मतदारसंघासाठी नेहमी अथकपणे काम करणारे माझ्या पतींच्या आदरामुळे हे सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहेत, ते जेव्हा प्रचार करायचे किंवा मतदारसंघात फिरायचे तेव्हा मी त्यांच्या सोबत हजर राहायचे. ते वाऱ्याच्या झुळुकीसारखा होते, त्यांच्याशी ताळमेळ राखणे कठीण होते.” असे यावेळी अश्विनी जगताप यांनी सांगितले.