शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे रेमडीसिवीर इंजेक्शनचा साठा शिल्लक नसल्याच्या बातम्या येऊ लागल्या. करोना साथीच्या काळात गंभीर रुग्णांसाठी रेमडीसिवीर इंजेक्शन जीव वाचवणारे औषध आहे. शहर परिसरात दररोज ३००० च्या आसपास करोना बाधित रुग्ण आढळून येत असून, शहरातील जवळ जवळ सर्व रुग्णालये संपूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. महानगरपालिका स्तत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि प्रशासनाने रेमडीसिवीर इंजेक्शनचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध न ठेवल्याने, करोना बाधित गंभीर असलेल्या रुग्णांच्या जीवाशी खेळत होते.
या परिस्थितीची दखल घेऊन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने दिनांक ८ एप्रिल २०२१ रोजी, सत्ताधारी भाजप आणि पालिका प्रशासनाविरोधात महानगरपालिकेच्या आवारात आंदोलन केले. आंदोलन चालू असताना समजले कि, महानगरपालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी श्री पवन साळवे, प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले पालिकेच्या भांडारात मुबलक प्रमाणत रेमडीसिवीर इंजेक्शनचा साठा शिल्लक आहे. आम्ही तत्काळ आरोग्य अधिकाऱ्याच्या कक्षात जाऊन त्यांना संबंधित विचारणा केली, परंतु त्यांच्याकडून रेमडीसिवीर इंजेक्शनचा साठा शिल्लक असल्याची कोणतीच माहिती मिळाली नाही. आरोग्य अधिकारी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत होते हे आम्हाला स्पष्ट जाणवले.
या संदर्भात भाजपचे सत्तारूढ पक्षनेते श्री. नामदेव ढाके यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले कि, महानगपालीकेच्या सर्व रुग्णालयांसाठी भांडार विभागाकडे ९०० रेमडीसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध आहे. याचबरोबर बाहेरून वाढीव २०० रेमडीसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यांनी सांगितले कि, रेमडीसिवीर इंजेक्शनचा कुठेही तुटवडा निर्माण झाला नाही आणि राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस चमकोगिरी करण्यसाठी आंदोलन करत आहे.
शहरभरात करोनामुळे गंभीर रित्या आजारी असलेल्या रुग्णांचे नातेवाईक शहरात रेमडीसिवीर इंजेक्शन घेण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात फिरत होते आणि आजही फिरत आहेत. खाजगी मेडिकल मध्ये रेमडीसिवीर इंजेक्शन मिळत नाहीत. अश्या गंभीर परिस्थितीत रुग्णांचे नातेवाईक राष्ट्रवादी युवक पदाधिकाऱ्यांना फोन करून विचारणा करत आहेत कि, कुठून तरी रेमडीसिवीर इंजेक्शन मिळवून द्या. राष्ट्रवादी युवक आणि वरिष्ठ नेत्यांना दररोज कमीत कमी ३० ते ४० फोन रेमडीसिवीर इंजेक्शन मागण्यासाठी येत आहेत.
युवक पदाधिकाऱ्यांना शहरात कुठेही रेमडीसिवीर इंजेक्शन मिळत नव्हते. युवकांना समजले, श्री नामदेव ढाके यांनी राणा भीमदेवी थाटात घोषणा करून सांगितले आहे कि महानगरपालिकेकडे ११०० रेमडीसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध आहे. युवक पदाधिकाऱ्यांना आश्चर्य वाटले, ते रोज रेमडीसिवीर इंजेक्शन नागरिकांना मिळवून देण्यसाठी शहरात फिरत आहेत आणि त्यांना कुठेच मिळत नाही. यामुळे रेमडीसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध असल्याचा दावा करणारे श्री नामदेव ढाके, यांचा संपर्क क्रमांक करोनामुळे गंभीर परीस्थित आजारी असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना सार्वजनिकरित्या उपलब्ध करून दिला. यामागे संपूर्ण निर्मळ हेतू होता कि, श्री नामदेव ढाके त्यांच्या दाव्यानुसार अगतिकपणे शहरात रेमडीसिवीर इंजेक्शन मिळविण्यासाठी वणवण भटकत असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना मदत करतील.
रुग्णांचे नातेवाईक श्री नामदेव ढाके यांना फोन करून रेमडीसिवीर इंजेक्शन मिळावे म्हणून मदत मागू लागले. एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी केलेल्या घोषणेनुसार या लोकांना महानगरपालिका आरोग्य अधिकाऱ्याकडे पाठवून रेमडिसिव्हीर इंजेक्शन मिळवून देणे अपेक्षित होते. परंतु असे न करता काल रात्री ते प्रसारमाध्यमांशी बोलले कि, माझा संपर्क क्रमांक सार्वजनिक करणाऱ्या राष्ट्रवादी युवक कार्यकारणीविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार आहेत. याचा अर्थ असा कि, श्री नामदेव ढाके रेमडीसिवीर इंजेक्शनच्या महानगरकेकडील साठ्याच्या बाबतीत खोटे बोलत आहेत.
एखाद्या लोकप्रतिनिधीचा संपर्क क्रमांक लोकांचे जीवन मरणाचे प्रश्न सोडविण्यासाठी सार्वजनिक करणे, आम्ही जनसेवेसाठीचे कर्तव्य मानतो. या सेवेसाठी जर युवक कार्यकारणी कारागृहात जाणार असेल तर ती आमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. श्री नामदेव ढाके आणि पोलीस आयुक्तांचे कष्ट वाचविण्यासाठी आम्ही स्वतः पोलीस आयुक्तांसमोर हजर होण्याचा विचार करत आहोत.
आमच्या मते सत्ताधारी भाजप आरोग्य अधिकारी आणि श्री. नामदेव ढाके यांच्या माध्यमातून मूळ मुद्यापासून लक्ष हटविण्याचा प्रयत्न करत आहेत. महानगरपालिकेच्या रुग्णालयातील रेमडीसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध नसल्याचे मूळ कारण भ्रष्टाचार आहे. सत्ताधारी भाजपला जोपर्यंत पाहिजे तसे कमिशन मिळत नाही तोपर्यंत ते रेमडीसिवीर इंजेक्शन खरेदी करत नाही. करोना साथीच्या या भयंकर परिस्थितीत सत्ताधारी भाजपने उरली सुरली शरम सुद्धा चार पैश्यासाठी गहाण टाकलेली दिसत आहे. शहरातील जनतेच्या जीवाशी खेळणे मात्र सत्ताधाऱ्यांना नक्कीच महागात पडेल.
शहरातील सत्ताधारी भाजपला जर शहरातील नागरिक जिवंत राहावे, याविषयी थोडीशी संवेदना असेल तर त्यांनी तत्काळ त्यांनी रेमडीसिवीर इंजेक्शनचा महानगरपालिकेकडील साठा कागदपात्रासहित सार्वजनिक करावा. याचबरोबर दिनांक ६ एप्रिल २०२१ पासून आज पर्यंत महानगरपालिकेने किती करोना बाधित रुग्णांना रेमडीसिवीर इंजेक्शन मोफत मिळवून दिले याचा तपशील जाहीर करावा. याचबरोबर रेमडीसिवीर इंजेक्शनच्या साठ्याच्याबाबत झालेल्या घोटाळ्याची महापालिका आयुक्त पातळीवर चौकशी केली जावी, अशी आमची मागणी आहे.