लेखिका | सिमरन सय्यद
गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जातो. विशेष म्हणजे हिंदू धर्माचे नवीन वर्ष म्हणून गुढी पाडवा साजरा केला जातो.
गुढीपाडच्या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात.उंच बांबूच्या काडीला कडूनिंबाची डहाळी ,काढीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात, फुलांचा हार आणि साखरेची गाढी बांधून त्यावर तांब्या /धातूचे भांडे बसवले जाते, गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो, तयार केलेली गुढी दारात ,उंच गच्चीवर लावतात. गुढीला गंध ,फुले ,अक्षता वाहतात व निरांजन लावून उदबत्ती दाखवतात. दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद-कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते. यादिवशी आनंद साजरा करीत एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या जातात.
गुढीपाडव्याचा दिवस हा अत्यंत शुभ मानला जातो. व या दिवशी जास्त लोक आपल्या नवीन व्यवसायास सुरुवात करतात. नवीन वस्तूची खरेदी करतात. नव्या उपक्रमांचा प्रारंभ देखील गुढीपाडव्याच्या दिवशी करतात.
कोरोना काळातील गुढीपाडवा…
या वर्षी गुढीपाडवा हा कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आला आहे. कोरोना काळात गुढी पाडवा कसा साजरा करावा, असा प्रश्न अनेकांना निर्माण होत आहे. तर या गुढीपाडव्याच्या दिवशी आपण काही नवीन करूयात…पण प्रशासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून.
गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या मुलांना सण व उत्सवाचे महत्व सांगा. या कठीण परिस्थितीत साध्या पद्धतीने आपल्या कुटुंबीयांसोबत गुढीपाडवा साजरा करा. व्हिडीओ कॉल, फोन द्वारे आपल्या नातेवाईकांनी कशा पद्धतीने गुढी उभारली ते पाहू शकता. व सर्वांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देऊ शकता. तर कोरोनाच्या नियमात घरच्या घरी लवकर उठा स्वच्छ धुतलेले कपडे घाला,रांगोळी काढा, गुढीपाडव्याचं महत्व जाणून घ्या, गुढी उभारा,गोडधोड खा, विविध खेळ खेळा आणि गुढीपाडवा उत्साहात साजरा करा.
सर्वांना गुढीपाडवा निमित्त हार्दिक शुभेच्छा…!!