शबनम न्युज / लोणावळा
लोणावळा हे महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यामध्ये असलेले एक पर्यटनस्थळ आहे.लोणावळा पुण्यापासून रस्त्याने ६४ किमी तसेच मुंबईपासून ९६ किमी अंतरावर आहे. लोणावळा चिक्की हा एक चवीने आंबट गोड असलेला सुप्रसिद्ध पदार्थ आहे. लोणावळा हे मुंबई व पुण्यामधील एक अतिमहत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे.पुण्यातून येथे येण्यासाठी उपनगरीय लोकल रेल्वेगाड्या असतात. मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवे आणि मुंबई – चेन्नई हायवे लोणावळा शहरातून जातो.
लोणावळा हे भारतीय नौदलाचे सर्वोत्तम तांत्रिक प्रशिक्षण केंद्र आयएनएस शिवाजीचे मुख्यालय आहे.लोणावळ्यात पावसाळयाच्या दिवसात पावसाच्या सरी अंगावर झेलत व ढगांच्या ओलसर धुकट वातावरणात हरवून जाण्यात खूप मजा वाटते. हिवाळयात तर धुके लपेटूनच फिरावे लागते. उन्हाळयात जांभळे आणि करवंदांची लयलूट असते.मुंबई-पुणे महामार्गावर समुद्रसपाटीपासून ६२५ मीटर उंचीवर सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावरील हे ठिकाण थंड हवेसाठी प्रसिद्ध आहे. विपुल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, वनश्रींने भरगच्च असलेले डोंगरमाथे व दऱ्या, पावसाळयात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे सारं काही मनाला खूपखूप सुखद वाटते. म्हणूनच या ठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते.
लोणावळा-खंडाळा
लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत.येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.
येथून दोन किलोमीटरवर कैवल्यधाम हा योगाश्रम आहे. येथे योगिक उपचारांसोबतच संशोधन व योग प्रशिक्षणसुद्धा दिले जाते. लोणावळयानजीक मळवलीवरुन कार्ले व भाजे लेणी अगदी पाच दहा किलोमीटर अंतरावर आहेत.
येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.
बसने जायचे झाल्यास पुण्याहून दर दोन तासांनी बस सेवा उपलब्ध आहे. लोणावळयाला रेल्वेनेही जाता येते. लोणावळा पुणे मुंबई रेल्वेमार्गावर आहे. येथे जलदगती ट्रेनसुद्धा थांबतात.