पिंपरी : रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अपक्ष नगरसेविका साधना मळेकर यांच्या २० वर्षांच्या मुलाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे कोरोना आजारावर उपयोगात येणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आहे. गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी हे इंजेक्शन जीवनदान देणारे आहे. परंतु, हे इंजेक्शन मिळत नाही म्हणून अनेक रुग्णांचा जीव जात आहे. असे असताना या इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अपक्ष नगरसेविका साधना मळेकर यांच्या मुलाला पोलिसांनी अटक केल्याने खळबळ उडाली आहे.
पुणे पोलिसांनी रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी वेगवेगळ्या तीन गुन्ह्यात पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून सहा इंजेक्शन जप्त केले आहेत. याप्रकरणी खडकी, अलंकार आणि डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
खडकी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात शुभम नवनाथ आरवडे (वय २२) आणि वैभव अंकुश मळेकर (वय २०) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून दोन इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत. वैभव मळेकर हा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अपक्ष नगरसेविका साधना मळेकर यांचा मुलगा आहे. त्या चिखली प्रभागातून निवडून आलेल्या आहेत.
डेक्कन पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात राहुल सुनील खाडे (वय २२) आणि विजय दिनकर पाटील (वय ३१) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून तीन इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत. अलंकार पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात विष्णु रामराव गोपाळघरे (वय ३४) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
वरील सर्व आरोपींनी रेमडेसिविर इंजेक्शन अवैधरित्या मिळवून ते स्वतःच्या ताब्यात बाळगले होते. तसेच स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी या इंजेक्शनची ते बेकायदेशीररित्या वैध किमतीपेक्षा जास्त किंमतीला विक्री करत होते. तसेच डॉक्टरांचे कोणतेही प्रिस्क्रिप्शन नसतानाही या इंजेक्शनची ते विक्री करताना आढळून आले आहेत. या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे