शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी चिंचवड शहराला जागतिक शहर म्हणून नावलौकिक मिळवून देण्यामध्ये इथल्या कष्टकरी कामगारांचे योगदान महत्वपूर्ण असून प्रत्येक नागरिकाने शहरासाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
कोरोनामुळे शहरातील उद्योगधंद्यांवर परिणाम झाला असला तरी लवकरच आपण कोरोनासारख्या संकटावर मात करू असा विश्वास महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्याच्या वर्धापनदिनानिमित्त तसेच जागतिक कामगार दिनानिमित्त त्यांनी शहरवासियांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात शहीद झालेल्या हुतात्म्यांना महापौर ढोरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. शहराच्या विकासासाठी आपले समर्पण देणा-या प्रत्येकाच्या त्यागाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कामगारांनी आणि कष्टक-यांनी या भूमीला नावलौकिक मिळवून दिला आहे. इथल्या उद्योगधंद्यांनी या नगरीला वैभवशाली बनवले. पिंपरी चिंचवड शहराला वैभव प्राप्त करून देण्यासाठी कामगारांचा सिंहाचा वाटा आहे. शहरातील कष्टकरी, कामगार, सामाजिक कार्यकर्ते, माध्यम प्रतिनिधी, शिक्षक, व्यापारी, उद्योजक, पोलिस, सैनिक, डॉक्टर, इंजिनियर, संशोधक, खेळाडू, कलावंत, साहित्यिक अशा सर्वांच्या त्यागातून, परिश्रमातून, योगदानातून आजची औद्योगिक पिंपरी चिंचवड नगरी घडली आहे. या शहराला स्मार्ट सिटी बनविणा-या या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करुन सर्वांचे आभार महापौर ढोरे यांनी मानले.
सध्या कोरोनामुळे महापालिकेची सर्व यंत्रणा युद्धपातळीवर काम करीत आहे. महापालिकेचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कामगार यांच्यासह पोलीस यंत्रणा देखील जीव धोक्यात घालून काम करत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक जण आपल्या परीने योगदान देत आहे. शासन आणि महापालिकेने कोरोना आजाराबाबत वेळोवेळी दिलेल्या विविध सूचना आणि आदेशांचे पालन करत असल्याबद्दल महापौर ढोरे यांनी नागरिकांचे आभार मानले. नागरिकांनी स्वत:ची आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करुन महापौर ढोरे यांनी केले. तसेच कोरोना संकटातून आपण सर्व लवकरच बाहेर पडू असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.